सांगली डॉट कॉम चला हवा येऊ द्या..

शेखर जोशी
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

लोकांना पर्याय मिळाला तर ते बदल करण्याची हिम्मत दाखवतात. जे सांगली महापालिकेत 2008 मध्ये घडले तेच 2016 मध्ये इस्लामपुरात घडलंय! इतिहासाची पुनरावृत्ती! गेली 31 वर्षे येथे जयंत पाटलांच्या शिलेदारांनी ताम्रपटावर लिहून दिल्यासारखी सत्ता भोगली. विरोधक दरवेळी डरकाळी फोडायचे आणि हसे करून घ्यायचे. लोकांना सक्षम पर्याय हवा होता. तो पर्याय विरोधकांनी प्रबळपणे दिला आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीने जेव्हा जनतेलाच अधिकार मिळाला तेव्हा लोकांनी दिग्गज नेत्यालाही जमिनीवर आणायला वेळ लावला नाही.

लोकांना पर्याय मिळाला तर ते बदल करण्याची हिम्मत दाखवतात. जे सांगली महापालिकेत 2008 मध्ये घडले तेच 2016 मध्ये इस्लामपुरात घडलंय! इतिहासाची पुनरावृत्ती! गेली 31 वर्षे येथे जयंत पाटलांच्या शिलेदारांनी ताम्रपटावर लिहून दिल्यासारखी सत्ता भोगली. विरोधक दरवेळी डरकाळी फोडायचे आणि हसे करून घ्यायचे. लोकांना सक्षम पर्याय हवा होता. तो पर्याय विरोधकांनी प्रबळपणे दिला आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीने जेव्हा जनतेलाच अधिकार मिळाला तेव्हा लोकांनी दिग्गज नेत्यालाही जमिनीवर आणायला वेळ लावला नाही. असाच पर्याय विट्यात, आष्ट्यात, कडेगावात मिळाला असता तर तेथेही लोक परिवर्तनासाठी इच्छुकच होते...कारण लोकांना ताजी हवा हवी आहे! प्रस्थापितांविरोधात संतापाची लाट आहे! सर्वच पक्ष-नेत्यांनी जिल्हापरिषद-पंचायत समित्या निवडणुकांसाठी त्यातून अर्थबोध घ्यायला हवा.

जयंत पाटील एक सक्षम नेते आहेत, याबद्दल नो डाऊट! पण त्याचे कसे आहे, ते जे विचार करतात तेच ते "करेक्‍ट' समजतात. विरोधकांचा ते "कार्यक्रम' करत असतात. अन्य कोणाच्या विचाराला तेथे फार जागा नसते! वर्ष 2008 सांगलीचा चेहरामोहरा बदलू असे जीव तोडून सांगत ते येथील गल्लीबोळात फिरले. लोकांना हा स्वच्छ चेहरा भावला. पर्याय मदन पाटलांपेक्षा नक्कीच कितीतरीपटीने चांगला वाटला; आणि लोकांनी मदन पाटलांची एकहाती असलेली 25 वर्षांची सत्ता उलथून टाकली होती. जयंतरावांचा अनुभव असा असतो की, सत्ता मिळेपर्यंत ते सर्वांचे ऐकतात एकदा मिळाल्यानंतर मात्र सल्ले चालत नाहीत. बदनाम चौकडीला सोबत घेऊन काम केले आणि सांगलीकरांनी अडीच वर्षांपूर्वी त्यांना पुन्हा इस्लामपूरला पाठवले. दिवंगत नेते मदन पाटलांच्या सत्तेत जे झाले त्याच इतिहासाची पुनरावृत्ती इस्लामपुरात झाली आहे. जयंतरावच आता गुंडगिरी, दहशत यावर भाषणे देतात तेव्हा अनेकांना हसू येत असेल. इस्लामपुरात विरोधकांचा विजय हा ऐतिहासिक आहे. लोकांनी जो जनादेश दिला आहे त्यातून चांगला अर्थमात्र राजू शेट्टी, सदाभाऊ, शिवाजीराव आणि निशिकांत पाटील या नेत्यांनी घ्यायला हवा ! सध्या जगभरात बदलाचे वारे आहे. तीन वर्षांपूर्वी देशात सत्तांतर झाले. मग राज्यात झाले. अमेरिकतही लोकांनी बदल केला. लोकांना बदल हवा आहे तोच तोचपणा नको आहे. लोक आता ताजी हवा येऊ द्या, म्हणताहेत आणि जयंतरावांनी विजयभाऊसारखे सलग तीस वर्षे महापालिकेत तळ ठोकून असलेला पर्याय दिला. आजच्या तरुणाईलाही अर्थातच फ्रेश आणि विकासकामाचा अनुभव असलेल्या निशिकांत पाटलांचा चेहरा सुटेबल वाटला.

आता जो बदल इस्लामपुरात घडला तसा अन्यत्र म्हणजे विट्यात, आष्ट्यात का झाला नाही? कारण सदाशिवराव पाटलांची सत्ता तर तीन पिढ्यांची आहे! दुर्दैवाने येथे जनतेला अनिल बाबरांचा पर्याय सक्षम वाटला नाही. थेट नगराध्यक्ष पदासाठी पाटलांच्या सुनेविरोधात बाबरांची सून हा पर्यायही लोकांना दुसऱ्या घराणेशाहीसारखाच वाटला. त्यामुळे बाबरांची घराणेशहीवरील टीका लोकांना भावली नाही. आष्ट्यात तर विरोधक बाळसेच धरू शकलेले नाहीत. तरीही येथे यावेळी प्रस्थापितांविरोधातला संताप व्यक्‍त झालाय. नेते विलासराव शिंदे यांच्या पत्नी मंगलादेवींना लोकांनी नाकारले आहे. त्या विद्यमान नगराध्यक्षा होत्या. कारभाराबद्दलची लोकांची ही नापसंतीच अधोरेखीत झाली आहे. एककाळ संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्याइतपत विलासरावांची येथे एकाधिकारशाही होती तिला लोकांनी यावेळी धक्‍का जरूर दिलाय तो तीन विरोधी नगरसेवक पाठवून! तासगावात आबा-काका गटातील संघर्ष जोरदार झाला तरी येथे दोन्ही कॉंग्रेसने वेगवेगळे लढत काकांविरोधात जोरात आदळाआपट केली पण काका निसटले आणि कमळ उगवलेच! पण येथे कमळ या चिन्हांवर भाजप प्रथमच सत्तेत येते आहे. पतंगरावांनी येथे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे टाळले की संजय पाटलांना कशाला अंगावर घ्या म्हणून तासगावला फारसे महत्त्व दिले नाही. येथे कॉंग्रेस भोपळाही फोडू शकले नाही. कडेगाव, पलूसह कॉंग्रेसने आपले गड राखले. विशेषत: पतंगरावांचे स्टार चांगले दिसले. विधान परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीला अस्मान दाखवलेच आणि नगरपालिकांतही आपले प्रगतिपुस्तक नेटके ठेवले. अर्थात या सर्व ठिकाणीही लोकांना ताजा हवा पाहिजे होती, याचे संकेत पहायला मिळालेच! कवठेमहांकाळला संजयकाका वगळून आघाडी करण्यात अजितराव घोरपडेंचा वेगळाच प्रयोग पाहायला मिळाला. तरीही संजयकाकांचे सहा नगरसेवक येथे सभागृहात आलेतच! आता एकमेकाचे हिशेब चुकते करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मैदान लवकरच भरणार आहे. मात्र लोकांना बदल हवा आहे. तेच तेच चेहरे नको आहेत. एवढा तरी अर्थ यातून प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने लक्षात घेतला तर जनतेचा "चला हवा येऊ द्या' हा संदेश फळास येईल!
पक्षीय पातळीवर विचार केला तर राष्ट्रवादी अस्तित्वहिन झाल्यासारखी दिसते आहे. विधान परिषद आणि दोन नगरपालिका आणि एक नगरपंचायतीने कॉंग्रेस सावरली आहे. भाजपचा डंका राज्यभरात वाजला आहे. सांगलीत त्यांच्या खासदारांनी एक नगरपालिका पक्षाच्या सातबारावर आणली आहे तर इस्लामपूरच्या सत्तांतरात भाजपचा मोलाचा वाटा आहे. किंबहुना युतीने थेट नगराध्यक्ष आणल्यानेच अनेक ठिकाणी परिवर्तने पहायला मिळाली. एका अर्थाने ही निवडणूक खासदार पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे नो जेजेपी ओन्ली बीजेपी या वक्तव्याची प्रचिती आणणारी ठरली. भविष्यात खऱ्याखुऱ्या बीजेपीचे पूर्वाश्रमीच्या जेजेपीशी संबंध कसे राहतात हे पाहणे रंजक ठरेल.
 

Web Title: sangali.com chala hava yeudya