PHOTOS : अप्रतिम ! या आहेत फुलांच्या सजावटीतील "मास्टर' ! 

नंदिनी नरेवाडी
शनिवार, 4 जानेवारी 2020

कृत्रिम वस्तूंपासून ताजी टवटवीत दिसणाऱ्या फुलांच्या तोरणापासून ते विविध धर्मातील विवाह समारंभातील आभुषणे त्या लिलया बनवतात. या सौंदर्य सजावटीचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलेल्या मोजक्‍या कलावंतापैकी त्याही एक आहेत.

कोल्हापूर - हौसेला मोल नाही असं म्हणतात, म्हणून कोणताही घरगुती समारंभ थाटामाटात करण्याची पद्धत आहे. या सजावटीला विशेष महत्व येते. मात्र कल्पकता पणाला लावून केलेली कलात्मक सजावट लक्षवेधी ठरते. अशी आकर्षक सजावट करण्यात संगीता सावर्डेकर माहिर बनल्या आहेत.

कृत्रिम वस्तूंपासून ताजी टवटवीत दिसणाऱ्या फुलांच्या तोरणापासून ते विविध धर्मातील विवाह समारंभातील आभुषणे त्या लिलया बनवतात. या सौंदर्य सजावटीचे अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलेल्या मोजक्‍या कलावंतापैकी त्याही एक आहेत. त्यांच्या कलाकुसरीतूनच विविध समारंभाचा थाटमाट, परंपरा याला प्रसन्नता आणि चैतन्याची झालर लाभली आहे. 

हेही वाचा - ...अन् एसटी दरीत कोसळता - कोसळता वाचली 

फुलापासून विविध दागिने

कोणताही समारंभ म्हटलं की महिला वर्गाला आपण हटके कसे दिसू याबाबत त्या विचार करू लागतात. त्यातही दागिने, आभुषणांच्या निवडीतही त्या चोखंदळ असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन सम्राटनगर येथील संगीता सावर्डेकर यांनी फ्लोरल ज्वेलरी बाबत शिक्षण घेतले. आपल्या बागेत असणाऱ्या फुलांपासून त्यांनी विविध दागिने बनविण्यास सुरवात केली. मेहंदी काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. सुरवातीच्या काळात नवऱ्या मुलीच्या हातावर विविध प्रकारच्या डिझाईन्स काढून त्या सर्वांचीच वाहवा मिळवत होत्या. हे काम करताना त्यांना लग्न समारंभात असणाऱ्या विविध गोष्टी, सजावटीचे साहित्य याचीही माहिती मिळत गेली. सजावटीच्या विविध फंड्यामध्ये फ्लोरलचाही वापर होऊ शकतो, हे त्यांनी ताडले. आणि दिल्ली, बेंगलोर याठिकाणी नैसर्गिक व आर्टिफिशयल फुलांपासून विविध सजावटीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. वेलवेट, फोम, मलबेरी पेपर, टिश्‍यु फ्लॉवर, ड्राय ग्रास, सोलावुड फ्लॉवर्स पासून त्या दागिने बनवू लागल्या. 

हेही वाचा - काही सुखद ! सावित्रीच्या 104 लेकींसाठी मिळवले पालकत्व 

एंगेजमेंट ट्रे सारखा नवा प्रकारही 

फुलांचे गजरे, किरीट, बाजूबंद, बांगड्या, कानवेल, झुमके, कर्णफुले, कमरपट्टा, हार, नेकलेस, नथ असे दागिन्यांचे नाना प्रकार त्या बनवितात. लग्नात नवरीसाठी लागणारे हरतऱ्हेचे गजरे त्या बनवितात. लग्नात ठेवला जाणारा रूखवताचेही खास आकर्षण असते. रूखवतांचे पॅकींगही त्या फुलांच्या विविध डिझाईन्सपासून तयार करतात. एंगेजमेंट ट्रे सारखा नवा प्रकार त्यांनी बनविला आणि त्याला नवरा नवरीसह नातेवाईकांचीही पसंती मिळाली. नैसर्गिक फुलांसोबतच आर्टिफिशयल फुलांचा दुप्पटा हे एक त्यांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य.

देश- विदेशातूनही वस्तूंना मागणी

ख्रिश्‍चन बांधवाच्या लग्नात मुलीला हेअर ब्रुश, टियारा, सॅटिनचा बुके, मुस्लिम समाजातील लग्नातील सेहरा, पंजाबी व सिंधी लग्नांमध्ये नवरीच्या हातातला कलिरे बनविण्यात त्या मास्टर आहेत. त्यांनी 60 ते 65 प्रकारच्या डिझाईन्सची तोरणे बनविली आहेत. त्यांनी बनविलेल्या या सजावटीच्या साहित्यांचे त्यांनी ऑनलाईन मार्केटही केले आहे. त्यामुळे त्यांनी बनविलेल्या या वस्तूंना कोल्हापूरात तर मागणी आहेच शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, दुबई, सिंगापूर अशा देशांतूनही मागणी वाढू लागली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangeeta Savardekar Expert In Flower Decoration Kolhapur Marathi News