सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांत 29 टक्के पन्नाशीवरील

अजित झळके 
Wednesday, 5 August 2020

जिल्ह्यात आजअखेर 3 हजार 640 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 29 टक्के लोक पन्नाशीवरील आहेत.

सांगली : जिल्ह्यात आजअखेर 3 हजार 640 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 29 टक्के लोक पन्नाशीवरील आहेत. अशी रुग्णसंख्या 1 हजार 77 इतकी आहे. कोरोना बाधितांत 21 ते 50 वयागटातील म्हणजे कामधंदा, उद्योग, नोकरीच्या निमित्ताने फिरस्तीवर असणाऱ्यांची संख्या 55 टक्के म्हणजे 2 हजार 36 इतकी आहे. 

कोरोनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात 24 मार्चला आढळळा. त्यानंतर साडेचार महिन्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाने वयोगटानुसार एक आलेख मांडला असून त्यातून महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाची बाधा घरातील ज्येष्ठांना होऊ देऊ नका, आजारी लोकांना यापासून शक्‍य तितके दूर ठेवा, असे आवाहन सातत्याने प्रशासनाकडून केले जात आहे. भविष्यात या मुद्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे दर्शविणारे हे आकडे आहेत. 50 वर्षाहून अधिक वयाच्या 29 टक्के लोकांना कोरोना झाला आहे. 

वय वर्षे शून्य ते एक असणारी तीन बालके कोरोना बाधीत झाली आणि ती पूर्ण बरी होऊन घरी परतली. त्यांनी कोरोनाला हरवलं. एक ते दहा वर्षे वयोगताली 194 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण बाधितांपैकी हा आकडा 5.32 टक्के इतका आहे. या मुलांनाही कोरोनावर मात केली आहे. 11 ते 20 वर्षे गटातील 330 युवक कोरोनाशी "फाईट' करत आहेत. 21 ते 50 वर्षे गटातील संख्या 2036 आहे. 51 ते 70 वयोगटातील 889 रुग्ण असून 70 वर्षे पार केलेल्या बाधितांची संख्या 188 इतकी आहे. विशेष म्हणजे यातील शंभर वर्षाचे आजोबा, 84 वर्षाची आजीबाई कोरोनाला हरवून घरी परतली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangli, 29 per cent of the cases are due to corona