सांगलीत एसटीचे "नो मास्क-नो सवारी'; काटेकोरपणे अंमलबजावणी होणार

घनशाम नवाथे 
Wednesday, 30 September 2020

सांगली जिल्हा पोलिस दलातील वाहतूक नियंत्रण शाखा आणि एसटी महामंडळ यांच्यावतीने आज "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत आज "नो मास्क-नो सवारी' या अभियानाची सुरवात एसटीच्या सांगली आगारात झाली. 

सांगली : जिल्हा पोलिस दलातील वाहतूक नियंत्रण शाखा आणि एसटी महामंडळ यांच्यावतीने आज "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत आज "नो मास्क-नो सवारी' या अभियानाची सुरवात एसटीच्या सांगली आगारात झाली. 

एसटीच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर, वाहतूक शाखा सांगलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम, मिरजेचे संजय क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानास प्रारंभ झाला. यावेळी काही बसेसच्या प्रवेशद्वारावर "नो मास्क-नो सवारी' असे फलक चिटकवण्यात आले. विभाग नियंत्रक ताम्हनकर म्हणाल्या, ""एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच प्रवाशांनी देखील मास्क घालणे आवश्‍यक केले आहे.

सध्या प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाते. प्रत्येक फेरीनंतर बसेस निर्जंतुकीकरण केल्या जात आहेत. तसेच प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ न करता सुरक्षित व उत्तम सेवेसाठी तत्परता दाखवली आहे. नो मास्क-नो सवारी या अभियानाची एसटी प्रवासात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.'' 

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत प्रत्येकाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. बसमधून प्रवास मास्क घालूनच करावा. मास्क नसेल तर प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई करावी, असे आवाहन सहाय्यक निरीक्षक निकम व क्षीरसागर यांनी केले. विभागीय वाहतूक अधिकारी आलम देसाई, आगार व्यवस्थापक चंद्रकांत पाटील, आर.डी. बेंद्रे, वाहतूक निरीक्षक अनिता सलगर, नियंत्रक महेंद्रसिंग ठाकूर, मुनीर आंबेकरी, आर.आर. पाटील, आर.डी. चव्हाण, वाहतूक पोलिस अरूण पाटील, सुनिल राऊत, अभिजीत पाटील, प्रशांत जाधव, विजय पाटील, सुनिल कोळी आदी उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli bus "No Mask-No Ride" will be strictly enforced