सांगलीचा बेदाणा दिल्लीत हजार रुपये किलो

सांगलीचा बेदाणा दिल्लीत हजार रुपये किलो

सांगली - जिल्ह्यातील बेदाण्याला तीन वर्षांपूर्वी जिओग्राफिकल इंडेक्‍स (जीआय) अर्थात भौगोलिक निर्देशांक मिळाला. ‘जीआय’ मानांकन हे बेदाण्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचे महत्त्व नुकतेच दिल्ली येथे झालेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर’ या प्रदर्शनात समजले.

सांगलीत २५० रुपयांपर्यंत बेदाण्याला दर मिळत असताना ‘जीआय’ बेदाण्याला दिल्लीत एक हजार रुपये किलो दर मिळाला. बेदाण्यासाठीचे ‘जीआय’ मानांकन संपूर्ण जिल्हा क्षेत्रासाठी असल्याने त्याचा शेतकऱ्यांना निश्‍चितच फायदा होऊ शकतो.

बेदाण्याचा शोध सांगली जिल्ह्यात साधारण ४५ वर्षांपूर्वी लागला असे सांगितले जाते. आज या बेदाण्याची गोडी केवळ भारतातच नव्हे तर जगभर पसरली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात विशेषत: तासगावमध्ये बेदाण्याची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. जिल्ह्याची बेदाणा  निर्मितीची क्षमता एक लाख मेट्रिक टन इतकी आहे. तर ४० हजार टनांहून अधिक बेदाणा प्रतिवर्षी निर्यात होतो. जवळपास ८० शीतगृहे तासगाव, सांगली परिसरात आहेत. जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बेदाण्यापासून मिळते. 

सांगलीच्या बेदाण्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि  पौष्टिकता यांचा सखोल अभ्यास जीआय मानांकन देण्यापूर्वी झाला. बेदाण्याची पातळ साल, गोडवा, रंग यामुळे मानांकन मिळाले. २०१६ मध्ये हे मानांकन मिळाले. ते घेताना तालुक्‍यापुरते न घेता संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रासाठी घेतले गेले. त्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील सर्व भागातील शेतकऱ्यांना भविष्यात मिळू शकतो. जीआय मानांकन घेतल्यानंतर त्याचा नेमका फायदा काय होणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. नुकतेच दिल्ली येथील प्रदर्शनात सांगलीचा जीआय मानांकनाचा बेदाणा विक्रीसाठी ठेवला होता. तेव्हा केवळ मानांकन आणि दर्जा पाहून २५० रुपये किलोचा बेदाणा चक्क १ हजार रुपये किलोला विकला गेला. ग्राहकांनी केवळ मानांकनाचा ‘क्वॉलिटी टॅग’ पाहून तो खरेदी केला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जादा दर आणि जागतिक बाजारपेठ मिळायची असेल तर त्यांचा बेदाणा ‘जीआय’ मानांकनाच्या निकषात उतरला पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने बेदाणा तयार करून मानांकनाच्या निकषात सातत्य ठेवले पाहिजे. तरच हा बेदाणा जागतिक व्यापार संघटनेच्या सभासद राष्ट्रांच्या बाजारपेठेत थेट जाऊ शकेल. 
-दिनकर पाटील 

सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com