सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनेलचा विजय निश्चित | Jayant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सहकार विकास पॅनेलचा विजय निश्चित

विटा - सांगली जिल्ह्यात समृद्धी वाढत आहे. त्याचे प्रतिबींब जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाढलेल्या उलाढालीत दिसत आहे. गेल्या संचालक मंडळाने सहा वर्षात चांगला कारभार करून बँक राज्यात अग्रगण्य म्हणून नावारूपास आणली आहे. येणाऱ्या संचालक मंडळापुढे जुन्या नोट बदलणे आणि मोठ्या संस्थांची थकबाकी ही दोन आव्हाने असणार आहेत. महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनेलचा विजय निश्चित आहे. असा विश्र्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

येथील पंचफुला मंगल कार्यालयात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीतील महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनेलची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार अनिल बाबर यांचा मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: अखेर 'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्याचे आदेश! नगरविकास विभागाची मंजुरी

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंक ही महत्त्वाची आर्थिक संस्था आहे. चांगली कामे करणारी लोक संचालक मंडळात पाहिजेत. ज्यांचा सहकाराशी संबंध नाही. असे लोक सहकार चळवळीत घुसू पहात आहेत. या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पारदर्शी पॅनेल उभा केले आहे. आमदार अनिल बाबर यांच्यासारख्या ज्येष्ठ संचालकांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानून राजकीय संस्कृती दाखवली. त्यातून आमच्यासारख्या तरुणांना दिशा मिळणार आहे.

आमदार अनिल बाबर म्हणाले, मी बिनविरोध निवडून आलो आहे. उर्वरित अकरा उमेदवारांना निवडून आणण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक परिवर्तन करणारी ही निवडणूक आहे. भविष्यात जीवनात क्रांती आणण्यासाठी बॅंक चांगली असली पाहिजे. ही भूमिका घेऊन सर्व उमेदवारांच्या पाठीशी शक्ती उभा करूया. प्रारंभी स्वागत अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जेष्ठ नेते रामरावदादा ‌पाटील, नंदकुमार पाटील, रवींद्र देशमुख, सुहास बाबर, अमोल बाबर, संजय विभूते, अशोक गायकवाड, अजित गायकवाड, विनोद गुळवणी, उमेदवार वैभव शिंदे, सुरेश पाटील, किरण लाड, पृथ्वीराज पाटील, अनिता सगरे, जयश्रीताई पाटील, जयसिंग पाटील यांच्यासह मतदार उपस्थित होते. राहुल साळुंखे यांनी आभार मानले.

loading image
go to top