
सांगली जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांनी जवळपास तीन महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. साखर उत्पादन 66 लाख क्विंटलहून अधिक झाले आहे.
सांगली : जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांनी जवळपास तीन महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. तीन महिन्यांत 57 लाख टनांहून अधिक गाळप झाले आहे. तर साखर उत्पादन 66 लाख क्विंटलहून अधिक झाले आहे. साखर उतारा सरासरी 11.51 टक्के इतका राहिला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला. तर काही कारखान्यांनी नोव्हेंबरच्या मध्यावधीनंतर हंगामास प्रारंभ केला. तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्याप तीन महिने साखर कारखाने सुरू राहतील असे चित्र आहे. यंदाच्या हंगामात ऊसतोडीसाठी मजुरांची टंचाई काही प्रमाणात भेडसावत आहे. त्यातूनच ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांकडे जादा पैसे मागितले जातात. एकरी पाच हजारापासून पुढे रक्कम मागितली जाते. वेळेत ऊसतोड होण्यासाठी शेतकरी बळी पडत आहेत.
यंदाच्या हंगामात 13 साखर कारखाने सुरू आहेत. माणगंगा, महांकाली आणि केन ऍग्रो हे कारखाने यंदा सुरू होऊ शकले नाहीत. तर तासगाव, यशवंत आणि जत कारखाने यंदा सुरू झाले आहेत. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या कारखान्यांच्या हंगामाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या हंगामात ऊस क्षेत्र वाढले आहे. गतवर्षी दुष्काळ, महापूर, अवकाळी पाऊस आदीमुळे ऊस क्षेत्र घटले होते. तसेच साखर उत्पादनही कमी झाले. यंदा मात्र अधिकाधिक गाळप होऊन एक कोटी क्विंटलहून अधिक साखर उत्पादन होईल अशी परिस्थिती आहे.
जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्वच कारखान्यांनी तीन महिन्यांचा हंगाम पूर्ण केला आहे. मागील आठवड्यापर्यंत 13 साखर कारखान्यांनी 58 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. तर 66 लाख क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन केले आहे.
गाळपामध्ये राजारामबापू कारखाना साखराळे आघाडीवर आहे. त्याखालोखाल सोनहिरा, क्रांती, दत्त इंडिया हे कारखाने आघाडीवर आहेत. साखर उत्पादनातही राजारामबापू कारखाना साखराळे कारखाना आघाडीवर आहे. त्याखालोखाल क्रांती, सोनहिरा, दत्त इंडिया आघाडीवर आहे.
संपादन : युवराज यादव