जिल्हाभर प्रचाराची रणधुमाळी टिपेला 

जिल्हाभर प्रचाराची रणधुमाळी टिपेला 

सांगली - झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्षांचे नेते, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, माजी मंत्र्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. जाहीर प्रचारासाठी तीन दिवस उरलेत. उमेदवार, नेत्यांकडून जाहीर सभा, कोपरा सभा, पदयात्रा आणि रॅलींना जोर आला आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत खलबते सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, कॉंग्रेसचे पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विश्‍वजित कदम यांच्याकडून सभांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. 

झेडपी, पंचायत समिती निवडणूक रिंगणात 652 उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेच्या 60 जागांसाठी 246 व पंचायत समितीच्या 120 जागांसाठी 406 उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज माघारीनंतर प्रचाराने वेग घेतला आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे पतंगराव कदम यांच्या सभांची धुरळा उडू लागलाय. भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत प्रचाराचे रान तापवले आहे. प्रचारासाठी अवघे तीन दिवसच उरल्याने आरोप-प्रत्यारोपांचा अक्षरश: धुरळा उडत आहे. रात्रीचा दिवस करून पदयात्रा, मोटासायकल रॅली, कोपरा सभा, बैठका, जाहीर सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. रिक्षा, पिकअप, बॅनर, सोशल मीडिया, पहिल्या, दुसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. पडद्याआडचे शह-काटशह, डाव-प्रतिडाव आखले जात आहेत. प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. निवडून येण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा केला जातोय. ढाबे, जेवणावळी, मद्यपुरवठ्याला ऊत आलाय. नातेवाईक, जातीचे कार्ड वापरण्यावर भर दिला जातो आहे. 

भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, विकास आघाडीच्या नेत्यांनी गावागावांतील प्रचार सभांची संख्या वाढवली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, अरुणअण्णा लाड, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, आमदार मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजित कदम, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आदी आपापल्या विभागात ठाण मांडून आहेत. एकही जागा हातून निसटणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. नव-नवे डाव मांडले जात आहेत. त्यामुळे गावागावांतील राजकारण चांगलेच तापले आहे. 

स्टार प्रचारकांची वाणवा 
राज्यात निवडणुका असल्याने आपापल्या जिल्ह्यातील प्रचारात नेते अडकलेत. परिणामी स्टार प्रचारक मिळणे मुश्‍कील झाले आहे. तरीही भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे राज्यातील काही वरिष्ठ नेतेही प्रचाराला आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com