#SangliFloods शहरात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम

#SangliFloods शहरात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम

सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर शहरासह तीरावरील गावांतील पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी आता पुन्हा अश्रू ओघळू लागले आहेत. पूर सोसला आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. पूर ओसरलेल्या सांगली शहरासह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झाले असून, शहर व जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 5.19 कोटी रुपयांचे वाटप झाले. सांगलीतील आयर्विन पुलावर पाणीपातळी 44 फुटांवर म्हणजे धोक्‍याच्या पातळी खाली गेली आहे. शहरातील पूर्ण पाणी नदीपात्रात जाण्यासाठी आणखी एखादा दिवस जाणार आहे.

दरम्यान, विद्युत पुरवठा सुरू करताना दुधगाव (ता. मिरज) येथील एका वायरमनचा विजेच्या धक्‍याने मृत्यू झाला; तर सांगलीत पुराच्या पाण्यात हॉटेल बुडाल्याच्या नैराश्‍यातून मालकाने आत्महत्या केली. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. शहरात मदतीचा ओघ कायम होता. 

सांगली जिल्ह्यातील महापुराचे संकट हटले आहे. शहर तसेच जिल्हाभरात आरोग्याची साथ पसरू नये, यासाठी स्वच्छता मोहीम महापालिका व ग्रामपंचायतींतर्फे सुरू करण्यात आली आहे. सांगली ग्रामीण भागातील 36 हजार आणि शहरातील 43 हजार कुटुंबांचे पंचनामे सुरू केले असून, त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये रोखीने मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 185 पथके काम करीत आहेत. 

सांगली शहरात पाणी उतरू लागल्यानंतर घरांसह दुकानगाळ्याची स्वच्छता सुरू झाली आहे. महापालिकेच्या 800 कर्मचाऱ्यांचा राबता सुरू झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर महापालिकांकडूनही पाठवण्यात आलेल्या गाड्या, आधुनिक स्वच्छता यंत्रांकडून काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे. शहरात आजही मदतीचा ओघ कायम होता. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरुच होता. 

ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतींकडून स्वच्छता केली जात आहे. जिल्ह्यात महापूर काळात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 27 पर्यंत वाढली असून, जिल्ह्यातील 3.75 हजार लोकांचे स्थलांतर झाले होते. 50 हजार स्थलांतरित जनावरांनाही आपापल्या घरी नेले जात आहे. 

महापूर अपडेटस्‌ 
0 आयर्विन पाणीपातळी धोक्‍यांच्या खाली-44 फुटांवर 
0 सांगली-कोल्हापूरसह बहुतांश रस्ते खुले 
0 जिल्ह्यात वेढलेली अद्यापही 12 गावे कायम 
0 एसटीची वाहतूक दोन दिवसात पूर्ववत 
0 प्रशासनाकडून चार तालुक्‍यांतील शाळांना बुधवारी सुटी 
0 वीजसेवा पूर्ववत करण्यासाठी "आयटीआय'च्या विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com