#SangliFloods पूरग्रस्तांना आजपासून सानुग्रह अनुदान वाटप सुरू

बलराज पवार
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सांगली - कृष्णा नदीच्या महापुरात उध्वस्त झालेल्या सांगलीकरांना आजपासून शासनाच्यावतीने सानुग्रह अनुदान वाटप सुरु झाले आहे. यासाठी 183  पथके तयार केली असून ते पूरग्रस्तांना भेटून थेट पाच हजार रुपये रोख अनुदान देत आहे.

सांगली - कृष्णा नदीच्या महापुरात उध्वस्त झालेल्या सांगलीकरांना आजपासून शासनाच्यावतीने सानुग्रह अनुदान वाटप सुरु झाले आहे. यासाठी 183  पथके तयार केली असून ते पूरग्रस्तांना भेटून थेट पाच हजार रुपये रोख अनुदान देत आहे.

महापुरात सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिल्या टप्प्यात रोख पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. आजपासून हे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. त्यानुसार आजपासून हे अनुदान वाटप सुरू झाले आहे.

कृष्णा नदीला आलेल्या महापुराने सांगली - मिरज - कुपवाड महापालिका क्षेत्रातील सुमारे पावणेदोन लाख नागरिक बाधित झाले आहेत. एकूण 42 हजार 631 कुटुंबांना याचा फटका बसला आहे. या सर्वांना शासनाने मदत होऊन पंधरा हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यातील पाच हजार रुपये रोख देण्यात येणार असून दहा हजार रुपये संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. 

महापालिकेसह जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस, कडेगाव या तालुक्यातील पूरग्रस्त गावांनाही अनुदान देण्यात येणार आहे महापालिका वगळता उर्वरित जिल्ह्यात सुमारे दीड लाख नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे तेथील एकूण 35 हजार कुटुंबे पुरग्रस्त आहेत. या कुटुंबांचा नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांना अनुदान वाटप होणार आहे.

पूरग्रस्तांना अनुदान वाटप पथकात तलाठी, कर सहाय्यक, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्यांना रोख पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या नुकसानीची पाहणी होणार आहे. त्यांचे नाव नोंदवून त्याचे बॅक अकाऊंट घ्यावेत यामध्ये दहा हजार रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Floods Extensive grants to flood victims from today