फोटोसेशन करणार असाल तर मदत नको, मिरजेत रोखठोक भूमिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यातील तीन हॉलमध्ये दोन हजारांवर हिंदू - मुस्लिम पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. त्यांना दररोज चहा, नाश्ता, जेवण, औषधे दिली जाताहेत. मदतीचा ओघ सुरु आहे, पण प्रवेशदारातच फलक लावालाय, फोटो काढायला परवानगी नाही. मदत स्वीकारण्याचा कक्षही हाँलपासून दूरवर आहे.

मिरज - पूरग्रस्तांना मदतीचे स्वागत आहे, पण फोटोसेशन करणार असाल तर मदत नको अशी ठाम भूमिका शहरातील विविध संस्था व संघटनांनी घेतली आहे. शहरातील पूरग्रस्तांच्या निवाऱ्यात मदतीचा महापूर आला आहे, पण त्यासोबत सेल्फी आणि फोटोसेशनचा चिखलही वाहून येत आहे. त्याला अडवण्याची रोखठोक भूमिका मदतकर्त्यांनी घेतली आहे. 

मिरज हायस्कूलमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. त्यांना मदत देण्यासाठी दररोज शेकडो नागरिक येताहेत. जेवण, पाणी, कपडे, औषधांचा महापूर आला आहे. पण त्यासोबतच मोबाईलचे फ्लँशही चकाकायला लागलेत. पूरग्रस्तांचे कोमेजलेले चेहरे टिपताहेत. उच्चभ्रू वर्गाच्या एका संघटनेकडून मदत दिली जात असताना फोटोसाठी त्यांच्यात चढाओढ लागल्याचे पहायाला मिळाले.

मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यातील तीन हॉलमध्ये दोन हजारांवर हिंदू - मुस्लिम पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. त्यांना दररोज चहा, नाश्ता, जेवण, औषधे दिली जाताहेत. मदतीचा ओघ सुरु आहे, पण प्रवेशदारातच फलक लावालाय, फोटो काढायला परवानगी नाही. मदत स्वीकारण्याचा कक्षही हाँलपासून दूरवर आहे.

बारा इमाम दर्ग्याजवळ बागवान हॉलमध्येही हजारभर पूरग्रस्त राहताहेत. तेथेही फोटोला परवानगी नाही. शहरातील काही मंगल कार्यालये, खासगी हॉल, सभागृहे येथीही लोकांची सोय मिरजकरांनी केली आहे, पण फोटोसेशन करणार असाल तर मदत नको असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काही संस्था व तरुण एकला चलो रे म्हणत मदतीची मोहीम राबवताहेत, पण त्यांनी कोठेही फोटोशेसन केले नसल्याचा सुखद अनुभवही येतोय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Floods If you are going to do photo secession, do not need help