#SangliFloods पुरग्रस्तांनो... धीराने घ्या!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

इस्लामपूर - मुसळधार पाऊस, महापुराने बेजार झालेल्या पूरग्रस्तांना अनेक पातळ्यांवर मदत येत असताना गावागावात झुंबड उडताना दिसत आहे. पुरग्रस्तांच्या संख्येच्या तुलनेत कैक पटीने मदत वाळवा तालुक्यात येत असताना पुरग्रस्तांच्या वागणुकीमुळे मदत करायला येणाऱ्यांची साफ निराशा होत आहे. त्यामुळे 'पुरग्रस्तांनो, धीराने घ्या' म्हणण्याची वेळ दात्यांवर आली आहे.

इस्लामपूर - मुसळधार पाऊस, महापुराने बेजार झालेल्या पूरग्रस्तांना अनेक पातळ्यांवर मदत येत असताना गावागावात झुंबड उडताना दिसत आहे. पुरग्रस्तांच्या संख्येच्या तुलनेत कैक पटीने मदत वाळवा तालुक्यात येत असताना पुरग्रस्तांच्या वागणुकीमुळे मदत करायला येणाऱ्यांची साफ निराशा होत आहे. त्यामुळे 'पुरग्रस्तांनो, धीराने घ्या' म्हणण्याची वेळ दात्यांवर आली आहे.

वाळवा तालुक्याला वारणा व कृष्णा नदीच्या पुराने न भूतो न भविष्यती असा वेढा दिल्याने नदीकाठावर अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. वारणा व कृष्णा नदीकाठावरील सुमारे ४० गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. सुमारे वीस हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. दहा हजार कुटुंबांना फटका बसला. प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि अन्य मार्गाने ही माहिती बाहेर जाऊन शेकडो लोकांनी वाळवा तालुक्यातील जनतेशी संपर्क साधून आपापल्या परीने मदत देण्याची भूमिका घेतली. प्रत्यक्षात मदतीचा ओघ प्रचंड प्रमाणात आहे.

सामाजिक संस्था, ट्रस्ट, मंडळे आणि स्थानिक पातळीवर जमा होणारी मदत मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा वाळवा तालुक्यात उपलब्ध नाही. पूरग्रस्त भागात मदत देण्यासाठी मोठ्या मनाने बाहेरील नागरिक वाळवा भागात ट्रॅक, टेम्पो भरून साहित्य घेऊन येत आहेत आणि ते ताब्यात मिळावे यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याने गोंधळ होत आहे. त्यामुळे मदत वाटायला आलेल्या माणसांची निराशा होत आहे. ज्यांच्यासाठी मदत आणली आहे, ती त्यांच्याचपर्यंत पोचतेय की नाही, मदतीच्या साहित्यावर तुटून पडणारे लोक खरेच गरजवंत आहेत का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. त्यामुळे पेच निर्माण होत आहे. त्यामुळे ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, असेही नागरिक मदतीपासून वंचित राहात आहेत. या परिस्थितीत पूरग्रस्तांनी संयमाची भूमिका घेऊन दान पदरात पाडून घ्यावे, असे सांगण्याची वेळ आली आहे. देणारे ज्या दातृत्वाच्या भावनेने देत आहेत, त्याच भावनेने घेणाऱ्यानीही घ्यावे, ही सामान्य अपेक्षा आहे.

स्वीकृती केंद्र सुरू करा !
तालुक्यात येणारी मदत स्थानिक संपर्काच्या माध्यमातून पोहचत आहे. नेमकी कुठे गरज आहे हे कळत नसल्याने एकेका गावात भरमसाठ मदत आणि दुसरीकडे तुटवडा असे होऊ नये, यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन मदत स्वीकृती केंद्र सुरू करण्याची गरज आहे. या केंद्रात नेमकी गरज कुठे, कुणाला याची माहिती उपलब्ध करुन दिल्यास योग्य आणि गरजू व्यक्तीला लाभ मिळेल आणि गोंधळही टाळता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Floods issue in Helping the afflicted