#SangliFloods अजून शंभर तास महापुराचे संकट कायम

#SangliFloods अजून शंभर तास महापुराचे संकट कायम

सांगली - कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने थोडी उसंत घेतली, हीच कृष्णाकाठासाठी या घडीची समाधानाची बातमी आहे. अशीच स्थिती सलग स्थिर राहिली आणि कोयना व अलमट्टी धरणातून समन्वयाने पाण्याचा विसर्ग कायम राहिला तरीही पुढचे शंभर तास महापुराचे संकट कायम राहणार आहे. या स्थितीत पावसाने पुन्हा जोर धरला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. 

दरम्यान, पूरस्थिती गंभीर असून महापुराच्या वेढ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आजही युद्धपातळीवर काम सुरु ठेवण्यात आले. ज्या लोकांना बाहेर काढणे शक्‍य नाही, त्यांच्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरने अन्नपुरवठा करण्यात आला. त्यासाठी दोन हेलिकॉप्टर आज कवलापूरच्या माळावरून उड्डाण करून शहरातील पुरग्रस्त भागात अन्न पुरवठा करत होते. उद्याही ही प्रक्रिया सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुरू असलेली वाढ थांबली आहे. दुपारपासून सायंकाळी सातवाजेपर्यंत अर्धाफुटाने पाणी पातळी घटली आहे. कोयना परिसरातील पाऊस व विसर्गाचा विचार केला तरीही पूर उतरण्यास किमान 100 तासांचे संकट अद्याप कायम राहणार आहे. कडेगावात एक जण महापूरात वाहून गेला असून आजअखेर 16 बळी गेले आहेत. 
सैन्य दलाची दोन हेलिकॉप्टने सांगलीवाडी, गावभाग, हरिपूर येथील पुरबाधितांना तीन फेऱ्यात अन्न पाकिट, पाणी, मेनबत्ती, बिस्किट पुड्यांचा समावेश होता.

पुरात आडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सैन्य दल, वायूदलासह राष्ट्रीय आपत्ती निवारण कक्ष, राज्य आपत्ती निवारण कक्षाचे जवान कार्यरत आहेत. सांगली शहरासह पुराने वेढलेल्या अठरा गावांत अद्यापही 40 हजारांवर लोक अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेचा प्रश्‍न कायम आहे. 

महाजन धारेवर 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दुपारी सांगलीवाडी येथील पूरस्थितीची पाहणी केली. त्यावेळी पूरग्रस्तांनी त्यांना घेराओ घातला व वेळेत मदत न मिळाल्याबाबत जाब विचारला. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी ब्रह्मनाळ येथे भेट दिली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. पूरग्रस्तांना मदत करताना एकाला हृदयविकाराचा झटका आला. 

76 बोटी कार्यरत 
प्रशासनाकडून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी 76 बोटी काम करीत आहेत. आज आणखी बोटी मागवून जिल्हा प्रशासनाने मदतीची गती वाढवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घातले आहे. सांगलीच्या महापुरा मध्ये सांगलवाडी या गावांमध्ये तब्बल चार हजार लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी आर्मी आणि नेव्ही गेलेले आहेत. अनेक लोक बाहेर काढण्यात आले आहेत. प्रशासनाकडून या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेत लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले जात आहे. 

आयर्विन पाणीपातळी 
सांगलीतील आयर्विन पुलावर सकाळी दहा वाजता 57.5 फूट एवढी विक्रमी पाणी पातळीची नोंद झाली. शहरातील चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक सांगली शहर जलमय झाले आहे. अनेक उपनगरांत पाणी शिरले आहे. सांगली शहरातील 40 हजाराहून आणि जिल्ह्यातील एक लाख असे 1.50 लाखाहून अधिक लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 8 फुटांनी, इस्लामपूरच्या बहे येथील 7 फुटांनी ताकारी 2 फुटांनी कमी झाली आहे. सांगली येथील पाणी पातळी अर्धा फुटाने उतरली आहे. 

0 जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या बचावासाठी दोन हेलिकॉप्टर, 500 हून अधिक जवान तैनात 
0 नदीकाठावर अद्यापही 40 हजार लोक अडकून 
0 ब्रह्मनाळमधील पूरबांधितांनी आज सकाळी सैनिकांची मदत 
0 सांगलीवाडीलाही सकाळी बारा वाजल्यापासून मदत 
0 बहे पुल रिकामा 
0 लष्कराची दोन हेलिकॉप्टर, आर्मी, नेव्हीच्या टीमसह एनडीआरएफ, टेरिटोरियल आर्मीची पथके पाचारण. 500 हून अधिक जवानांचा समावेश 

पुराने वेढलेली 18 गावे... 
मिरज तालुक्‍यातील बामणी, जुनी धामणी, अंकली, हरिपूर, मौजे डिग्रज. वाळवा तालुक्‍यातील शिरगाव, भरतवाडी; पलूस तालुक्‍यातील भिलवडी, तावदरवाडी, सुखवाडी, राडेवाडी, सूर्यगाव, तुपारी, बुर्ली, नागराळे, दह्यारी, घोगाव, पुणदीतर्फ वाळवा या गावांना पुराने वेढले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com