सांगलीत दरोडेखोरांच्या टोळीस ‘मोका’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

सांगली - शहरात दीड महिन्यापूर्वी व्यापाऱ्याचा ३ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या दरोडेखोरांच्या पाच जणांच्या टोळीविरुद्ध ‘मोका’ लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिल्याची माहिती अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. टोळीचा सूत्रधार विजय पांडुरंग शिंदे (वय २४, सिद्धनाळ, ता. जत), बाळू रावसाहेब गावडे (२५), मारुती विलास शिंदे (२१, वाघमोडेनगर, कुपवाड) यांना अटक केली आहे, तर अन्य दोन साथीदार फरारी आहेत.

अधीक्षक शिंदे म्हणाले, ‘‘मार्केट यार्डातील ‘रामदेव ट्रेडर्स’ या दुकानाचे मालक महावीर उमेदराज भन्साळी (४४, आरवाडे पार्क) हे २६ जुलै रोजी रात्री सव्वा नऊ वाजता मोपेडवर कामगार गोविंद लोहार याला बसवून घराकडे निघाले होते. आरवाडे पार्कजवळ दरोडेखोरांनी मोपेडला धडक देऊन भन्साळी यांना खाली पाडले. मोपेडमध्ये ३ लाख ७५ हजार रुपये होते. रकमेसह मोपेड टोळीने लांबवली. एलसीबीचे निरीक्षक बाजीराव पाटील यांनी तपास करून ४८ तासांत दरोड्याचा छडा लावला. विजय शिंदे, बाळू गावडे, मारुती शिंदे यांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.’’

ते म्हणाले, ‘‘टोळीतील तीन दरोडेखोरांना अटक केली आहे. तर, दोघेजण अद्याप फरारी आहेत. टोळीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी वारंवार अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले. टोळी सराईत गुन्हेगारांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सूत्रधार विजय शिंदेसह पाच जणांविरुद्ध मोका लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना पाठवला होता. त्याला कालच मंजुरी मिळाली आहे. तिघांना ‘मोका’ मध्ये अटक केली जाईल. तसेच फरारी दोघांचा शोध सुरू आहे.’’

एलसीबीचे निरीक्षक बाजीराव पाटील, पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यावेळी उपस्थित होते.

आणखी एक टोळी ‘रडार’वर

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत नुकताच गुंड दुर्गेश पवार टोळीला मोका लावला. सध्या त्याचा तपास सुरू आहे. त्यानंतर दरोडेखोर विजय शिंदे टोळीला मोका लावण्यास मंजुरी मिळाली. आणखी एक टोळी ‘रडार’ वर आहे. गुन्हेगारांनी डोके वर काढल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक शिंदे यांनी दिला.

Web Title: Sangli gang of dacoits and robbers 'Moka'

फोटो गॅलरी