साताऱ्याला पाणी सांगलीकर पोचविणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

टॅंकरसाठी टेंडरधारक सांगलीचे, आज होणार निर्णय

टॅंकरसाठी टेंडरधारक सांगलीचे, आज होणार निर्णय
सातारा - टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आज टॅंकरची ऑनलाइन टेंडर उघडण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यामध्ये प्रथम दोन टेंडर सांगलीतील ठेकेदारांनीच भरले. मात्र, यामध्ये एकाने प्रतिदिनाचे टॅंकर भाडे, तर दुसऱ्याने किलोमीटरनुसारचे टॅंकर भाडे कमी दराने भरले आहे. त्यामुळे टेंडर कोणाला द्यायचे यावर रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय पडताळणी सुरू होती.

साताऱ्याच्या दुष्काळी भागाला आजपर्यंत बारामती व फलटण तालुक्‍यांतील ठेकेदारांच्या टॅंकरने पाणी पुरविले जात होते; पण आता टेंडर प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने राज्यातून कोणीही टॅंकर पुरविण्याचे टेंडर ऑनलाइन पद्धतीने भरू शकतो. आज सातारा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर पुरविण्याचे ऑनलाइन टेंडर जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आले. यामध्ये दोनच टेंडर धारकांनी कमी किमतीचे टेंडर भरल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या दोघांपैकी कोणाचे टेंडर अंतिम करायचे हा प्रश्‍न महसूल अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. या दोन टेंडरधारकांपैकी एकाने प्रतिदिन टॅंकरचे भाडे कमी दराचे दिले आहे, तर दुसऱ्याने किलोमीटरनुसार टॅंकरचे भाडे कमी दराचे भरले आहे. मुळात प्रशासनाला दोन्हीबाबत कमी दराने भरलेले टेंडर अपेक्षित आहे. त्यामुळे या सांगलीतील दोन टेंडरधारकांपैकी कोणाचे टेंडर निश्‍चित करायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासंदर्भात दिवसभर आपलेच टेंडर निश्‍चित व्हावे, म्हणून हालचाली सुरू होत्या, तर अधिकाऱ्यांपुढे कोणाचे टेंडर निश्‍चित करायचे हा यक्ष प्रश्‍न उभा होता. अखेर जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांच्यापर्यंत ही बाब गेल्यानंतर त्यांनी उद्या (गुरुवारी) या टेंडरचा फैसला करण्याची भूमिका घेतली आहे. टेंडर कोणालाही मिळो, मात्र साताऱ्याच्या टंचाईग्रस्त गावांना सांगलीकरच पाणी पोचविणार हे निश्‍चित आहे.

Web Title: sangli gives water to satara