सांगलीतील गुळाची बाजारपेठ संपवण्याचा काहींचा उद्योग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

सांगली - मार्केट यार्डातील काही गूळ व्यापाऱ्यांनी येथील गुळाची बाजारपेठ उद्‌ध्वस्त करण्याचा उद्योग सुरू केला आहे. थेट गुऱ्हाळातून गूळ उचलून विक्री सुरू केल्यामुळे चार महिन्यात ११ हजार ५२६ क्विंटलने आवक घटली आहे. जुलै महिन्यात तर गुळाची बाजारपेठ अधिकच मंदावली आहे.

सांगली - मार्केट यार्डातील काही गूळ व्यापाऱ्यांनी येथील गुळाची बाजारपेठ उद्‌ध्वस्त करण्याचा उद्योग सुरू केला आहे. थेट गुऱ्हाळातून गूळ उचलून विक्री सुरू केल्यामुळे चार महिन्यात ११ हजार ५२६ क्विंटलने आवक घटली आहे. जुलै महिन्यात तर गुळाची बाजारपेठ अधिकच मंदावली आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारे बेदाणा, हळद आणि गुळाचे सौदे देशभर प्रसिद्ध आहेत. बाजारपेठ म्हणून सांगलीची सर्वत्र ओळख आहे. परंतु, गुळाची इथली बाजारपेठ उद्‌ध्वस्त करण्याचा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. गुळाची बाजारपेठ ही ओळख पुसून टाकण्याचे पाप काही व्यापारी करीत आहे. अडतीची चुकवेगिरी करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून गुळाचे व्यापारी आणि अडते थेट कर्नाटकातील काही बाजारपेठा आणि गुऱ्हाळगृहातून गूळ उचलत आहेत.

दुकान बाजार समिती आवारात आणि व्यापार मात्र कर्नाटकात असा त्यांचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे शासनाचे, बाजार समितीचे आणि हमालांचे नुकसान होत आहे. या प्रकारामुळे हमालांनी दोन आठवड्यापूर्वी गुळ व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकला होता. तो प्रश्‍न अद्यापही सुटला नाही. बाजार समितीमध्ये दिवाणजी म्हणून आलेले काहीजण इथल्या बाजारपेठेमुळे व्यापारी बनले. परंतू त्यातील काहींनी इथली बाजारपेठच संपवण्याचा उद्योग सुरू केला आहे.

कर्नाटकातील काही बाजारपेठेत अडत एका टक्‍क्‍यांनी कमी आहे, तसेच हमाली देखील कमी आहे. त्यामुळे काही व्यापारी तेथून गुळ उचलण्याचा उद्योग करीत आहे. अडत आणि हमालीच्या दराबाबत चर्चा न करता थेट कर्नाटकात जाऊन व्यापार करण्याच्या प्रवृत्तीमुळे बाजारपेठेचे नुकसान होत आहे. सध्या हैद्राबाद पट्टयामध्ये गुळाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून सांगलीची गुळाची आवक कमी होत आहे.

गुळाच्या आवकेचे चित्र
मार्च महिन्यात ८० हजार ६६५ क्विंटल आवक झाली. एप्रिलमध्ये ८६ हजार ७९० क्विंटल, मे महिन्यात ९४ हजार ३०४ क्विंटल, जून महिन्यात ७८ हजार ८२५ क्विंटल गुळाची आवक झाली आहे. चार महिन्यात तब्बल बारा हजार क्विंटलने आवक घटल्याची धक्कादायक माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Jaggery market issue