येतगावातील कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कातील चौघे "निगेटिव्ह"

संतोष कणसे
Monday, 27 April 2020

कोरोना बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या चौघांचा कोरोना चाचणीचा अहवाल आज  ''निगेटिव्ह'' आला आहे. त्यामुळे येतगावसह, प्रशासन व तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला.

कडेगाव : येतगाव (ता. कडेगाव) येथील मलकापूरस्थित (कराड) 'त्या' कोरोना बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या चौघांचा कोरोना चाचणीचा अहवाल आज  ''निगेटिव्ह'' आला आहे. त्यामुळे येतगावसह, प्रशासन व तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला.

येतगाव येथील एक पस्तीस वर्षीय तरुण मलकापूर येथे गेल्या काही वर्षांपासून पत्नी व मुलासह राहत आहे. तर त्याचे आई वडील मात्र येतगाव या आपल्या गावी राहतात. सध्या तो कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लंबर म्हणून काम करीत असून लॉक डाऊनमुळे त्याची पत्नी व मुलगा आपल्या मूळ गावी येतगावला आले होते. त्यांना परत मलकापूर येथे नेण्यासाठी तो तरुण सोमवारी (ता.13) आपल्या घरी येतगावला मुक्कामी आला होता. त्यावेळी अशक्तपणा जाणवल्याने त्याने गावातील खासगी दवाखान्यात जावून उपचार घेतले होते. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.14) पत्नी व मुलासह मलकापूरला गेला. त्यानंतर तेथे त्याला सर्दी, ताप व खोकला जाणवू लागला त्यानंतर उपचारासाठी कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेला असता तेथे त्याच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतले होते. तर शनिवारी (ता.25)
'त्या' तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

याबाबतची माहिती मिळताच कडेगाव तालुक्यातील प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या. येतगावच्या 'त्या' तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी तालुक्यात पसरल्याने येतगावसह तालुक्यातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने येतगावला धाव घेत 'त्या' तरुणाच्या संपर्कात आलेले त्याचे आई-वडील,संबंधीत डॉक्टर व कंपाउंडर असे चौघांना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन केले.

 त्यानंतर आरोग्य विभागाने काल रविवारी (ता.26) त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेवून ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज रात्री उशिरा प्राप्त झाला. संबंधित चौघांचा अहवाल ''निगेटिव्ह'' आल्याचे समजले. त्यामुळे या चौघांसह त्यांचे नातेवाईक,प्रशासन व तालुक्यातील नागरिकांनाही दिलासा मिळाला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli kadegaon yetgaon corona presents relative report are negative