Dam Water Storage : धरणांनी तळ गाठला; कोयनेत १३, वारणेत बारा टीएमसी साठा sangli koyana dam 13 tmc and warna chandoli dam 12 tmc Water balance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

koyana dam

Dam Water Storage : धरणांनी तळ गाठला; कोयनेत १३, वारणेत बारा टीएमसी साठा

सांगली - कृष्णा नदीच्या खोऱ्यातील धरणांनी तळ गाठला आहे. कोयना धरणात १३ टीएमसी तर चांदोली धरणात १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. संपूर्ण जून महिन्यात पाणी अत्यंत जपून वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे धोरण आहे. पाऊसकाळ लांबला तर अडचण होऊ शकते, या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी सर्व धरणांत शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षभरात टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ योजनांसाठी सलगपणे पाणी पुरवठा करण्यात आला. काही योजना उशीरा सुरु झाल्या, मात्र आवर्तनात सातत्य राखण्यात आले. आताही म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात प्रभावीपणे पोहचत नसल्याबाबत तक्रारी आहेत.

शिवाय, सांगोला तालुक्याच्या शिवारापर्यंत पाणी नेणे अपेक्षित आहे. या स्थितीत धरणांनी तळ गाठणे चिंता वाढवणारे ठरू शकते, कारण पाऊस लांबेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मॉन्सून वेळेवर दाखल झाला तर मात्र फारसा काळजीचा विषय असणार नाही.

एकीकडे टंचाईची संभाव्य स्थिती विचारात घेऊन आखणी सुरू असताना पाटबंधारे विभागाने पूर, महापुराच्या दृष्टीनेही तयारी ठेवली आहे. महापूर नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पूर नियंत्रण कक्ष

सांगली पाटबंधारे विभागाने १ जूनपासून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केला आहे. उद्घाटन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते झाले. हा कक्ष ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.