सांगली : पाण्यातून बाहेर येत घेतला मगरीने अखेरचा श्‍वास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सांगली : पाण्यातून बाहेर येत घेतला मगरीने अखेरचा श्‍वास!

सांगली : कृष्णा-वारणा संगमावरील ब्रम्हनाळच्या डोहात त्याचे राज्य होते. कुणी आपल्या क्षेत्रात येवू नये, यासाठी दहशत निर्माण केली होती. इतर मगरींशी अनेकदा युद्धही केले होते. पण वय झालं. आपलं साम्राज्य सोडून अखेरचा प्रवास करावा लागला. राज्य असलेल्या डोहाच्या बाहेर येवून तिने अखेरचा श्‍वास घेतला. ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे १२ फुटी वयस्क नर मगरीचा मृतदेह काल आढळून आला.

कृष्णा नदीत मगरीचे साम्राज्य आहे. अनेक मगरींचे वास्तव्य या ठिकाणी आहे. अनेकदा मगरींचे दर्शनही होत असते. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे शेतीकामासाठी काल सकाळी शेतकरी नदीकाळी गेले होते. त्यावेळी बारा फुटी महाकाय मगर त्यांना दिसून आली. घाबरलेल्या शेतकऱ्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु हालचाल दिसून आली नाही. धाडसी तरुणांनी जवळ जावून पाहिले असते हालचाल दिसली नाही. त्यानंतर तत्काळ वनविभागास कळवण्यात आले.

वनक्षेत्रपाल युवराज पाटील, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मगर मृत असल्याचे समोर आले. त्या मगरीस उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. ही मगर १२ फुटी आहे. नर मगरीचे वय साधारणतः १५ वर्ष असावे. तीन-चार वर्षांत अन्य मगरीशी भांडण झाल्याने उजव्या बाजूचे पाऊल आणि जबडा जखमी झाला होता. वयोमानाने त्या मगरीचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणीस पुढे आले आहे.

नदीच्या पाण्यातील मगरीचे साधारणतः आयुष्य २० वर्षांचे असते. सांगली आणि परिसरात १८ फुटांपर्यंत मगरी आढळल्या आहेत. ब्रम्हनाळ येथे मृतावस्थेत आढळलेल्या मगरीचा वयोमानाने मृत्यू झाला असावा. मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे. ह्या काळात मोठ्या मगरी ह्या आक्रमक असतात व आपल्या पिल्लांना/प्रजातीला धोका निर्माण होऊ नये, म्हणून तिच्या अधिवासात येणाऱ्या प्राण्यांवर तसेच मानवावर जीवघेणे हल्ले करू शकतात, असे मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Sangli Krishna River Crocodile

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..