सांगलीत कृष्णा नदीत मगर आढळली ; नागरिकांमध्ये घबराट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

अनेकजण या धांदलीत पायऱ्यांवर पाय घसरुन पडले. पोहणाऱ्यांचा एवढा दंगा सुरु होऊनही मगर मात्र निवांतपणे पोहत होती. प्रसंगावधान राखून संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी बोट घेत मगरीच्या दिशेने मोर्चा वळवला. त्यानंतर बायपास पुलाच्या दिशेकडे निघून गेली. तिला वेळीच हुसकावल्याने अनर्थ टळला. 

सांगली : कृष्णा नदी पात्रात माई घाट ते सांगलीवाडी नवा घाट यादरम्यान मगरीने अचानकपणे प्रवेश करीत पोहणाऱ्या लोकांमध्ये थरकाप उडवून दिला. नेहमीच्या अनुभवी पोहणाऱ्या मंडळींनी प्रसंगावधान राखून मगरीचा नावेतून पाठलाग करीत तिला नव्या पुलाच्या दिशेने पिटाळून लावले. 

कृष्णा नदीच्या काठावर दररोज मगरीचे दर्शन होते. तरीही दररोज पोहायला जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. उन्हाळ्यामुळे गर्दी वाढलीच आहे. शाळांना अद्याप सुट्टया नसल्यातरी त्यांची गर्दी सुरू झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता वसंतदादा समाधीस्थळ ते सांगलीवाडी या मार्गावरील नदीकाठी दुतर्फा पोहायला गर्दी होती. वसंतदादांच्या समाधीस्थळापासून फुटी मगरीने अचानक पाण्यात प्रवेश केला. अचानकपणे पोहणाऱ्यांच्या घोळक्‍यात ती दिसल्यानंतर सर्वांचा थरकाप उडाला. प्रत्येकजण पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धावाधाव करु लागला. मुले भयभीत झाली होती.

अनेकजण या धांदलीत पायऱ्यांवर पाय घसरुन पडले. पोहणाऱ्यांचा एवढा दंगा सुरु होऊनही मगर मात्र निवांतपणे पोहत होती. प्रसंगावधान राखून संजय चव्हाण व मोहन पेंडसे यांनी बोट घेत मगरीच्या दिशेने मोर्चा वळवला. त्यानंतर बायपास पुलाच्या दिशेकडे निघून गेली. तिला वेळीच हुसकावल्याने अनर्थ टळला. 

संजय चव्हाण, शिरीष रेळेकर यांनी विष्णूघाट, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट येथे पोहणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. 

दरम्यान, सांगली, हरिपूर, सांगलीवाडी, पद्माळे, ब्रम्हनाळ, भिलवडी, कसबे डिग्रज, तुंग या नदीकाठच्या परिसरात पाणवठ्यावर मगरी येण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, वाळू उपशावर बंदी आल्याने आता मगरी बिथरून पाणवठ्यावर येण्याचे प्रमाण यथावकाश कमी होईल, असे पर्यावरणवादी कार्यकर्ते अजित पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sangli Krushna River Crocodile Found Peoples have Afraid