संजयकाका, ठिगळं सांधणार कशी?

अजित झळके
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

सांगली - सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग रविवारी (ता. २३) नागजमध्ये फुंकले जाईल. खासदार संजय पाटील यांचा गेली चार वर्षे मूड ‘गड्या आपला महाराष्ट्र बरा’ असाच राहिल्याचे चर्चेत होते. त्या सुप्तचर्चांना विराम देत ‘पुन्हा दिल्ली’चा नारा देण्याचं त्यांनी ठरवलं आहे.

सांगली - सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग रविवारी (ता. २३) नागजमध्ये फुंकले जाईल. खासदार संजय पाटील यांचा गेली चार वर्षे मूड ‘गड्या आपला महाराष्ट्र बरा’ असाच राहिल्याचे चर्चेत होते. त्या सुप्तचर्चांना विराम देत ‘पुन्हा दिल्ली’चा नारा देण्याचं त्यांनी ठरवलं आहे.

आता खरे आव्हान आहे ते फाटलेल्या, उसवलेल्या गोष्टी सांधण्याचे. त्यांच्याभोवती सर्वपक्षीय (विशेषतः काँग्रेस) कार्यकर्त्यांचा गराडा असला तरी मूळ भाजपमधील नाराजीवर उतारा शोधावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा  संयुक्त दौरा ही या पॅचअप मोहिमेची सुरवात मानली जातेय. 

सर्वपक्षीय चांगले की वाईट?
खासदार संजय पाटील यांच्याकडे मदनभाऊ समर्थक, सदाशिवराव पाटील समर्थकांसह सर्वपक्षrयांची ऊठबस असते. ती लपून-छपून कधीच राहिलेली नाही. आता हे चांगले आहे की वाईट, हा वादाचा मुद्दा आहे. कारण, या गर्दीत आम्ही झाकोळले जातोय, अशी मूळ भाजप कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या जखमेवर मलमपट्टीचेही आव्हान असणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी किंवा फेब्रुवारीत लागेल, असे संकेत मिळत आहेत. उणेपुरे  दोन महिने बाकी आहेत. सन २०१४ ला देशभरात मोदी लाट होती. या लाटेत सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला नेस्तनाबूत करत भाजपने ऐतिहासिक कमळ फुलवले होते. खासदार संजय पाटील ध्यानीमनी नसताना विक्रमी मताने खासदार झाले आणि बदलत्या राजकीय प्रवाहात ते जिल्ह्याच्या ‘ड्रायव्हिंग सीट’वरदेखील विराजमान झाले.  

या काळात त्यांनी जिल्हाभर स्वतःचा गट बांधला, विविध पक्षीयांना सोबत घेत त्यांनी गट अधिक मजबूत केला. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत पक्ष म्हणून  त्यांनी ‘हातचे राखून’ भूमिका घेतली होती. त्यामुळे पक्षातून नाराजी उमटली, तक्रारी झाल्या, मात्र त्याला ते बधले नाहीत. उलटपक्षी त्यांनी सिंचन योजनांसाठी  अधिक आक्रमक होत प्रसंगी राजीनामा देण्याची धमकीही दिली. संजयकाकांचे चाललेय काय? त्यांचा मूड काय? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांनी कृष्णा  खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद आणि कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देऊन या वादळांना दाबून ठेवले.

दुसरीकडे संजयकाकांनी भाजपमधील नेत्यांना अंगावर घ्यायचा सिलसिला कायम ठेवला. त्याची सुरवात माजी मंत्री 
अजितराव घोरपडे यांच्यापासून झाली. पुढे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याशी त्यांना उघड संघर्ष सुरू ठेवला. जिल्हा परिषद अध्यक्षबदलाच्या  अयशस्वी प्रयत्नापर्यंत तो कायम आहे. त्यात गोपीचंद पडळकर या भाजपच्या स्टार प्रचाराने संजयकाकांना खुले आव्हान दिले. आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप यांच्याशीसोबतही त्यांच्या कुरबुरी चर्चेत आल्या. महापालिका निवडणुकीत संजयकाका ताकदीने उतरले नाहीत, त्याचीच चर्चा होत राहिली. दुसरीकडे त्यांची काँग्रेस नेते, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याशी सलगी, जतमध्ये काँग्रेसचे विधानसभेचे संभाव्य  उमेदवार विक्रम सावंत यांच्याशी जवळीक भाजपला बोचणारी ठरली.

मित्रपक्ष शिवसेनेतील आमदार अनिल बाबर यांच्याशी त्यांनी उघड राजकीय शत्रुत्व जपले. इतक्‍या ठिकाणी उसवाउसवी झाल्यानंतर आता संजयकाकांना पॅचअपचे कामही हाती घ्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसचा चेहरा ठरायचा आहे. तो ठरल्यानंतर आमने-सामने लढत सुरू होईल, त्याआधी भाजपमध्ये झालेले ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी संजयकाका काय पावले उचलणार, याकडे विशेष लक्ष असणार आहे. फडणवीस, गडकरी यांच्या दौऱ्यातून त्याची सुरवात होईल, असे सांगितले जाते. महामार्गाच्या कामाची कुदळ मारताना हे दोन नेते संजयकाकांचा ‘पुन्हा दिल्ली’चा मार्ग सुकर करणार का, याकडे विशेष लक्ष असणार आहे.

Web Title: Sangli Lok Sabha constituency