सांगलीत लोकसभेसाठी जयंतरावांच्या ‘मनातला’ उमेदवार काँग्रेस देईल ?

सांगलीत लोकसभेसाठी जयंतरावांच्या ‘मनातला’ उमेदवार काँग्रेस देईल ?

सांगली लोकसभेची जागा आघाडीच्या वाटपात काँग्रेसच्या वाट्याला जाणार आणि इथला उमेदवार प्रथेप्रमाणे दिल्लीत ठरणार, या साचेबद्ध पटकथेपर्यंतचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. भाजप आता लोकसभा मतदारसंघातील गावा-गावापर्यंत पसरला; तर गावा-गावांपर्यंत पसरलेली काँग्रेस आता अधिकाधिक संकुचित होत चालली आहे. भाजपचे आव्हान तगडे असले तरी काँग्रेसने उमेदवार चांगला दिला तर ते बिकट नक्की नाही. मात्र, त्यासाठी जयंत पाटील यांनी ‘कार्यक्रम’ करण्याच्या सवयीला फाटा दिला पाहिजे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, त्यांचे बंधू विशाल, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि आमदार विश्‍वजित कदम अशा चार नावांची शिफारस दिल्लीला झाली आहे. आता तिथे व्हायचा तो निर्णय होईलच; पण दिल्लीत आणि गल्लीत सांगलीत बदललेल्या समीकरणांची उजळणी आता गरजेची झाली आहे, ज्याकडे काँग्रेसच्या व्यासपीठावर चर्चाच होत नाही. दुसरीकडे राज्यभर काँग्रेस आघाडीच्या तयारीचे नगारे वाजत असले तरी जिल्ह्यात मात्र अद्याप सामसूमच आहे. खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी तगड्या उमेदवाराचे भाकित केले तरी त्यांच्या मनात कोण आहे, ते नाव अद्याप गुप्तच ठेवले आहे.  

चांदोली ते जतपर्यंत कधीकाळी काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते. वर्चस्वाचा तो काळ संपला आहे. आता दोन्ही काँग्रेसच्या गढीची पुरती पडझड झाली आहे. गेल्या चार-साडेचार वर्षांत काँग्रेसचा एकही जिल्हास्तरीय मेळावा झालेला नाही. शहरापुरती प्रसंगोचित आंदोलनांचा उपचार वगळता जिल्ह्यात काँग्रेसचे नेटवर्क थंड आहे. आर. आर. पाटील, पतंगराव कदम, मदन पाटील अशी नेतेमंडळी आता नाहीत.

कार्यकर्त्यांना बांधून ठेवता येईल, असा सत्तारूपी डिंक नाही. अशा एकूण प्रतिकूल स्थितीत काँग्रेसला इथे नव्याने उभारी घ्यायची झाली तर राष्ट्रवादीला सोबत घ्यावे लागेल. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आलेल्या जयंत पाटील यांनी कधी नव्हे ते महापालिका निवडणुकीत आघाडीसाठी आग्रह धरला आणि प्रामाणिकपणे काँग्रेसच्या प्रचाराचीही भूमिका घेतली. मात्र, काँग्रेसशी त्यांचे अपेक्षित असे सूर जुळलेच नाहीत. 

आता लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत जयंतराव किंवा राष्ट्रवादी चर्चेतच नाहीत. मध्यंतरी त्यांनी ‘काँग्रेसचा इथे तगडा उमेदवार असेल’ असा भाकितवजा अंदाज वर्तवला इतकेच. तीच त्यांची लोकसभेची जिल्ह्यातील तयारी. राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमधून खासदार झालेल्या संजय पाटील यांच्याबाबतीत त्यांनी साडेचार वर्षांत चकार शब्द काढलेला नाही.

संजय पाटील यांनीही इस्लामपूरकडे कधी पहायचीही तसदी घेतलेली नाही की जयंतरावांविषयी ब्र काढलेला नाही. हे सारे वास्तव दिल्लीपर्यंत पोचले असेलच असे नाही. काँग्रेसचे आजचे अस्तित्व पक्ष म्हणून नव्हे, तर गट म्हणून उरले आहे. या गटांची मोट बांधणारा उमेदवार हवा. दुसरीकडे मित्रपक्ष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र यावेत आणि ते काँग्रेसच्या मागे उभे राहावेत, यासाठी ‘फोर्स’ हवा. तो फोर्स जयंतराव कोणासाठी देतील, याचा अंदाज पक्षश्रेष्ठी कितपत घेतील हे पाहायला हवे. तशी चर्चा काँग्रेसकडूनही फारशी होताना दिसत नाही. काँग्रेसच्या नेत्यांचे सध्याचे प्रयत्न आमची जागा आहे, आम्ही निर्णय करू असेच आहेत.  

पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारावेळी जयंत पाटील यांनी विश्‍वजित यांच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून ताकद देऊ असे संकेत बोलके होते. शिवाय सांगलीच्या लोकसभेच्या उमेदवारीवर जयंतरावांसह अन्य कोणत्याच नेत्याने जाहीर भाष्य केलेले नाही. जयंतरावांना आजवर काँग्रेसचाच ‘कार्यक्रम’ करायची सवय जडली आहे. अर्थात महापालिका निवडणुकीपासून त्यांचे धोरण बदलले आहे. त्याचा काँग्रेस कसा फायदा करून घेते, यावर लोकसभेच्या ‘बिग फाईट’चा निकाल ठरेल..! 

‘तगडा’ उमेदवार कोण?
काँग्रेसकडे सध्या जिल्ह्यातील पालकत्व करायलाच नेता उरलेला नाही. राज्यभर काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ उतरलेले जयंतराव सांगलीत डोकवायलाही तयार नाहीत. जयंतरावांच्या मनातला तगडा उमेदवार कोण, याबद्दलही तर्क-वितर्क लढविले गेले. त्यानंतर विश्‍वजित कदम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांच्या नावांची चर्चा सुरू झाली. मात्र, या दोघांनीही नकार दर्शविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com