Loksabha 2019 : एका पराभवातच सांगलीची काँग्रेस संपली ?

Loksabha 2019 : एका पराभवातच सांगलीची काँग्रेस संपली ?

स्वातंत्र्यानंतर फक्त एकदाच म्हणजे २०१४ ला काँग्रेसचा सांगलीचा बालेकिल्ला ढासळला. देशातही काँग्रेसचा चक्काचूर झाला. थेट ४२ जागांवर काँग्रेस आली; पण आता इथे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने थेट नांगीच टाकली. ही जागा स्वाभिमानीला बहाल करायचा निर्णय प्रदेश स्तरावरून आता झाला आहे. आता त्यावर दिल्लीत अंतिम फैसला होईल. निर्णय काय व्हायचा तो होवो; मात्र कधी काळी राज्याचे उमेदवार ठरवणाऱ्या सांगलीवर अशी वेळ यावी, ही इथल्या काँग्रेसजणांच्या वारसांचे कर्तृत्व म्हणायचे का?

सलग गेली ४० वर्षे वसंतदादा घराण्याला सांगली जिल्ह्याने दिल्लीत पाठवलं. अगदी आणीबाणीनंतरच्या इंदिराविरोधी लाटेतही न डगमगलेली काँग्रेस मोदी लाटेत वाहून गेली काय, असा सवाल उपस्थित झालाय...कारण ही जागा आता स्वाभिमानी या कालपरवा जन्माला आलेल्या पक्षाला सोडण्यासाठी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठींनी विचार सुरू केला आहे. हा सारा प्रकार म्हणजे काँग्रेसला राज्यात आणि जिल्ह्यातही नेतृत्व उरले नाही असे म्हणायची वेळ आली आहे.

गेले काही दिवस अफवांचा बाजारच भरला आहे. त्यातच काँग्रेस नेतृत्वाचा हा प्रताप जेव्हा सांगलीतील कार्यकर्त्यांना समजला तेव्हा जी संतप्त प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते ते उमटली; मात्र त्यातला फोलपणाही  लक्षात यावा इतका भोंगळ होता. कार्यकर्त्यांनीच काँग्रेस भवनला टाळे ठोकले, खरे मात्र त्यावर एका पत्रकाराने दिलेली प्रतिक्रिया इतकी बोलकी होती की, काँग्रेसच्या इथल्या दोन्ही कार्यालयांची आधीची कुलपे काढली होती का हे आधी पहा. या कमेंटमध्ये काँग्रेसवर ही वेळ का आली याचे उत्तर आहे.

अर्थात असा निर्णय अपेक्षित नसला तरी एकदम अनपेक्षित पण नाही कारण गेले काही दिवस सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन दिग्गज युवा नेते विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात लोकसभेसाठी एकमेकाचे नाव घेण्याचीच स्पर्धा लागली होती. (पूर्वी ही जागा मिळविण्यासाठी कदम गटाने आकाश-पाताळ एक केले होते. मांडवही घातले होते आणि ऐनवेळी उतरवले होते.) या दोघांचे ठरेना म्हटल्यांवर राष्ट्रवादीतील दिलीपतात्या, सुमनताई, अरुण लाड, अण्णा डांगे यांच्यासह अन्य काही गल्लीतील नगरसेवकपदाची उमेदवारी मागावी अशा थाटात उमेदवारी मागत होते. कारण आधी नगरच्या जागेबाबत अदलाबदलीची चर्चा होती.

त्यानंतर स्वाभिमानी आघाडीच्या साटेलोट्यात सांगलीचा बळी द्यायची वेळ आली. अर्थात याचा कानोसा गेल्या आठवडाभरापासूनच इथल्या काँग्रेसजणांना आला होता. मात्र त्यानंतरही इथले काँग्रेसजन एकत्र येऊन पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यासाठी दिल्लीत एकवटले असे मात्र झाले नाही. किंबहुना आजची त्यांची देहबोली ही संतापापेक्षा हतबलतेची अधिक  होती. त्यातूनच त्यांच्यातील लढण्याचे धैर्य स्पष्ट होत होते. एकूणच साऱ्या घडामोडी काँग्रेसच्या ऱ्हासपर्वाची अखेरची चाहूल देणाऱ्या होत्या.

एकूणच काँग्रेसमध्ये मतभेद, गटबाजी नवी नाही. मात्र, अशी हतबलता किंवा एकमेकांच्या शह-काटशहात स्वतःचेच नाक कापून घेण्याचा हा प्रकार वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, पतंगराव कदम, आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख, विष्णुअण्णा पाटील, मदन पाटील अशा दिग्गजांनी धुरा वाहिलेल्या काँग्रेसमध्ये घडावा यासारखे राजकीय दुर्दैव नसेल. भले त्याला काँग्रेस आघाडी धर्माचा मुलामा दिला तरी यामागचे हे गटबाजीचे वास्तव दडून राहणारे नाही. मात्र हे लोण केवळ लोकसभेपुरते मर्यादित राहील अशा भ्रमात राहणेही स्वतःची फसवणूकच करणारे ठरेल. पक्ष म्हणून नव्हे तर बघता बघता गटापुरते काँग्रेसचे अस्तित्व आता जिल्हाभर उरले आहे.

ही राजकीय दिवाळखोरीच आहे. आधी काँग्रेस नेत्यांनी आपल्या संस्था तर दिवाळखोरीत घातल्या आता पक्षसुद्धा. कदाचित नवे काही निर्माण होण्यासाठी आधीचे सारे काही नष्ट करावे लागते. हे काँग्रेसजणांनी अगदीच मनावर घेतलेले दिसतेय.

काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी हातकणंगले व सांगली या दोन्ही मतदारसंघात अनेक टर्म सत्ता भोगली आहे. मात्र राष्ट्रवादीने राजू शेट्टींसमोर आघाडीचा प्रस्ताव आधीच देऊन टाकल्याने तेथेही राष्ट्रवादीचे चिन्ह  असणार नाही तर सांगलीही मित्र पक्षाला बहाल केल्याने इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही काँग्रेसचे चिन्ह  निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात दिसणार नाही. ज्यांना येथील घराणी संपावयची होती त्यांचे दोन्ही हेतू यामुळे सफल होणार आहेत. घराणेही हेरले आणि पक्षही!

त्यामुळे कदाचित निवडणुकीआधीच सांगली जिल्हा काँग्रेसमुक्‍त होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पतंगराव कदमांसाराख नेता काळाच्या पडद्या आड  गेल्याने संपूर्ण गडच सोडण्याचा निर्णय धक्‍कादायक आहे. दादा-कदम गटाने मनावर घेतले तर ही ऐतिहासिक चूक ते टाळू शकतात, एवढेच! काँग्रेसमधील जी तरुण फळी आहे त्यांनी याचा विचार केला पाहिजे.

अगदी सांगलीपासून जतपर्यंत पसरेल्या या पक्षातील प्रतीक पाटील, आमदार विश्‍वजित कदम, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत, सत्यजित देशमुख, वैभव पाटील या तरुण नेतृत्वाने न लढता आपला गड सोडला असे उद्या इतिहास नोंदविले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com