वसंतदादा घराण्यातील चौघांसह सहा इच्छुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

सांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, शैलजा पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते यांच्या नावावर चर्चा झाली. आमदार विश्‍वजित कदम यांनी स्वतः व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. 

सांगली - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील १४ जिल्ह्यांतील मतदारसंघनिहाय आढावा बैठक मुंबईत झाली. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी माजी मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, शैलजा पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते यांच्या नावावर चर्चा झाली. आमदार विश्‍वजित कदम यांनी स्वतः व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. 

जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी प्रतीक यांना उमेदवारी न देता बदलाची  जोरदार मागणी केली. मुंबईतील टिळक भवनात झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह पक्षाचे वरिष्ठ उपस्थित होते. 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात मोदी लाटेत काँग्रेसचा पराभव झाला. ‘राष्ट्रवादी’तून ऐनवेळी भाजपवासी झालेल्या संजय पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा तब्बल अडीच लाख मतांच्या फरकाने पराभव केला. गेल्या साडेचार वर्षांत आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ‘राष्ट्रवादी’चे नेते आर. आर. पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, मदन पाटील या दिग्गजांच्या निधनामुळे या वेळी काँग्रेस-‘राष्ट्रवादी’समोर भाजपचे कडवे आव्हान असेल. खासदार संजय पाटील यांची भाजपमधील उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून कोण, याबद्दल कुतूहल आहे. आजच्या बैठकीत मात्र नव्या कोणत्याही नावाची चर्चा झाली नाही. 

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी साडेचारची वेळ होती. सुमारे दीड तास सांगलीच्या नेतेमंडळींचे घमासान सुरू होते. उमेदवारीवर प्रमुख दावा असणारे माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली. नामदेवराव मोहिते यांनी जनतेला उमेदवारीत बदल हवा आहे हे ठासून सांगितले. त्यांच्या पवित्र्यामुळे वातावरण तंग झाले. विश्‍वजित कदम यांनी मात्र ‘आमच्या कुटुंबातील कोणीही सदस्य उमेदवारीसाठी इच्छुक नाही’ असे सांगितले.

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पक्षातर्फे इच्छुकांची यादी श्रेष्ठींसमोर मांडली. त्यांनी स्वतःसाठी उमेदवारी मागितली नाही. मात्र, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती पार पाडू, असे सांगत आपणही उमेदवारीच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले. विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. आमदार मोहनराव कदम, जयश्री पाटील उपस्थित नव्हत्या. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा झाली. ‘राष्ट्रवादी’बरोबर आघाडी असावी, असा स्पष्ट सूर काँग्रेसच्या सर्वच इच्छुकांनी लावला.  

जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांकडे
बैठकीत वेगवेगळ्या ब्लॉक समित्यांकडून वसंतदादा घराण्याची उमेदवारांच्या नावाची शिफारस झाली. नेतेमंडळी एकमताने जो उमेदवार देतील त्या निर्णयाला पाठिंबा राहील, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सहा नावांची पक्षाकडे नोंद घेत जिल्हास्तरावर आपण एकमताने निर्णय घ्या. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी असेल, असे सर्व इच्छुकांना सांगितले.

Web Title: Sangli Loksabha constituency election special

टॅग्स