
मी आणि आमदार गोपीचंद पडळकर आता एकत्र आहोत. त्यामुळे कोणीही विरोधात उतरले तरी यावेळी मताधिक्यात मोठी वाढ दिसेल आणि एकतर्फी निवडणूक जिंकू.
Sanjay Patil : जत्रा जवळ आली म्हणून सराव करणारा पैलवान मी नाही; भाजप खासदाराचं काँग्रेस-राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज
सांगली : जत्रा जवळ आली म्हणून सराव करणारा पैलवान नाही. नेहमीच व्यायाम करणारा माणूस आहे. आमची तयारी सुरूच असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत (Sangli LokSabha Election) मला ६ लाखांवर मते मिळाली होती.
गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) तीन लाख मते होती. आता आम्ही दोघे एकत्र असल्याने ९ लाखांवर मते जातील. निवडणूक एकतर्फी जिंकू, असा दावा भाजपचे खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मुंबईत काल झालेल्या लोकसभा आढावा बैठकीत काँग्रेसचे (Congress) प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगलीतून लढण्याचे संकेत दिल्याबद्दल विचारले असता खासदार पाटील यांनी भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.
ते म्हणाले, ‘‘काही पैलवान जत्रा जवळ आली की व्यायामाला सुरवात करतात. मी कायमच सराव करणारा पैलवान आहे. काँग्रेस सांगली लोकसभा लढण्याच्या तयारीत आहे, त्यांचा उमेदवार ठरला असेल, याचा विचार आम्ही करत नाही. मी आणि आमदार गोपीचंद पडळकर आता एकत्र आहोत. त्यामुळे कोणीही विरोधात उतरले तरी यावेळी मताधिक्यात मोठी वाढ दिसेल आणि एकतर्फी निवडणूक जिंकू.’’
‘महापालिका निवडणुकीत लक्ष घालणार’
‘‘खासदार म्हणून महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालणार आहे. काही घटना गेल्या काही काळात घडल्या. त्यामुळे पक्षाची बदनामी होते. हे बरोबर नाही. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. महापालिका आयुक्तांसमवेत दोनवेळा बैठक झाली आहे,’’ असे खासदार संजय पाटील म्हणाले.