सांगली ; ‘सोनहिरा’चे दहा लाख टन उसाचे गाळप

आजअखेर कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी गाळप
सोनहिरा कारखान्याने
सोनहिरा कारखान्याने sakal

कडेगाव: डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्याने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून, २०२१-२२ या चालू गळीत हंगामात उच्चांकी दहा लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे.हे आजअखेर कारखान्याच्या इतिहासातील उसाचे उच्चांकी गाळप आहे. कारखान्याने पूर्ण केलेला दहा लाख टन ऊस गाळपाचा टप्पा म्हणजे डॉ. पतंगराव कदम यांची स्वप्नपूर्ती मानली जात आहे.

कडेगाव तालुका हा प्रामुख्याने ऊस उत्पादक तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे; तर सोनहिरा कारखान्याचा ऊसदर हा चांगला असल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकरी ‘सोनहिरा’लाच ऊस देणे पसंद करतात. परिणामी, तालुक्यातील सर्वाधिक उसाचे गाळप हे सोनहिरा कारखानाच करतो. कारखान्याने आजपर्यंत २२ गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत; तर सध्या कारखान्याचा २३ वा गळीत हंगाम सुरू असून, या हंगामात कारखान्याने १० लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. हे आजअखेर कारखान्याच्या इतिहासातील उसाचे उच्चांकी गाळप आहे.

कारखान्याने नऊ लाख ७९ हजार टन हे यापूर्वीचे आपले ऊस गाळपाचे रेकॉर्ड मोडत आता १० लाख टन उसाचे गाळप पूर्ण करून नवीन मापदंड निर्माण केल्याने सभासद व उत्पादकांतून कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, डॉ. विश्वजित कदम यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाचे कौतुक होत आहे.

डॉ. पतंगराव कदम यांची स्वप्नपूर्ती..!

कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार ‘सोनहिरा’ची वाटचाल सुरू आहे. कारखान्याचा कारभार हा स्वच्छ व पारदर्शकपणे सुरू असून, शेतकऱ्यांच्या उसाला सातत्याने चांगला दर दिला आहे. तसेच, कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना यासह अनेक बहुमान यापूर्वी मिळाले आहेत; तर या हंगामात कारखान्याने आजवरच्या इतिहासातील उच्चांकी १० लाख टन उसाचे गाळप करून नवीन मापदंड निर्माण केला. त्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, सर्व संचालक मंडळ, सर्व ऊस पुरवठादार सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com