सांगली : मंत्री नितीन गडकरी येती घरा, चला खड्डे भरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला खड्डे भरा

सांगली : मंत्री नितीन गडकरी येती घरा, चला खड्डे भरा

सांगली: आपल्या सांगलीत कोण मोठा नेता येणार हाय का हो? एका सामान्य सांगलीकराला प्रश्‍न पडला. त्याचं कारण होतं, शहरात जागोजागी रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी सुरू असलेली लगबग. एरवी सांगली खड्ड्यात गेली तरी कुणाला सोयरसुतक नसतं. आताच ही हालचाल सुरू आहे म्हटल्यावर शंका यायचीच. अर्थातच, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी (ता. २६) दौरा असल्याने आज खड्डे भरण्याची लगबग सुरू होती.

कुणीतरी मोठा नेता येणार असेल तरच सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे काम दिसते, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यातून काहीतरी मोठे साध्य होते, याची अनुभूती तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्यावेळी आलीच होती. त्यावेळी शहर खोकीमुक्त झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री, महसूलमंत्री येणार असतील तर मग पटापट कामे होताना दिसतात. रस्त्याच्या कडेला औषध टाकले जाते. खड्डे भरले जातात. आतादेखील तेच सुरु आहे. नितीन गडकरी यांचा दौरा शहरातील प्रमुख भागातून होणार आहे. कवलापूर ते कॉलेज कॉर्नर, तेथून मिरज रोड, नेमिनाथनगर, तेथून खरे क्लब असा पल्ला ते गाठणार आहेत. सहाजिकच, प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरून गडकरींची स्वारी जाणार आहे. ते आपल्या भाषणात खड्ड्यांवरून खरडपट्टी काढतील, ही भिती सहाजिक आहे. त्यामुळे पटापट खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते लवकर व्हावे, यासाठी वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

सांगलीला नेत्यांचे दौरे वारंवार झाले तर कामे गतीने होतील आणि सांगलीचे भले होईल, अशी अपेक्षा सांगलीकरांना नक्कीच आहे. अर्थात, राज्याच्या राजकारणात प्रभावी नेते असलेले जयंत पाटील वारंवार सांगलीला येतच असतात, मात्र त्यांची धास्ती या यंत्रणेला वाटत नसावी बहुधा! गडकरींच्या दौऱ्याने मात्र हालचाली गतीमान झाल्या आहेत.

Web Title: Sangli Minister Nitin Gadkari Came Home Fill Pits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..