निवडणुकीसाठी जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी येत्या ३० जूनला प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक पुढे जाईल अशी चर्चा होत असली तरी प्रशासनाकडून मात्र वेळेतच निवडणूक होईल यादृष्टीने सर्वतोपरी तयारी सुरू आहे. सुधारित आढाव्यानुसार येत्या आठवडाभरात आचारसंहिता जाहीर होऊ शकते. त्यानंतरचे तीस दिवस आचारसंहितेचे गृहीत धरले तरी २२ किंवा २९ जुलैला महापालिका निवडणूक होऊ शकते. विद्यमान सभागृहाची मुदत १३ ऑगस्टला संपणार असून त्याआधी नवे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात यावे लागेल. 

पूर्वनियोजित घोषणेनुसार पाच जूनला अंतिम यादी जाहीर होणार होती. तथापि आयोगाकडून सध्या ‘ट्रू व्होटर ॲप’शी मतदार यादीच जुळवण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यास विलंब झाला. सध्या प्रभागनिहाय मतदार याद्या निश्‍चित करण्यात येत असून १८ जूनपर्यंत त्यावर हरकतींसाठी मुदत आहे. मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्धी २ जुलैला आहे. ही प्रक्रिया समांतरपणे एकीकडे सुरू राहीलच, त्याच वेळी निवडणूक आचारसंहिताही सुरू होऊ शकते. जास्तीत जास्त ४५ दिवस आचारसंहिता लागू शकते. हा कालावधी तीस दिवसांचाही असू शकते. त्यानुसार पुढील आठवडाभरात आचारसंहिता लागू शकते. १५ जूनपूर्वी आचारसंहिता लागणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून संकेत मिळाले होते. त्यामुळे येत्या आठवडाभरात म्हणजे १८ ते २२ जून दरम्यान आचारसंहितेची घोषणा होऊ शकते. तिथून ३० दिवस विचारात घेता २२ किंवा २९ जुलैला मतदान होऊ शकते. कारण या दोन्ही दिवशी रविवार आहे. निवडणूक विहित मुदतीच्या पुढे ढकलण्यासाठी निश्‍चित असे कारण राज्य शासनाकडे नाही. नैसर्गिक आपत्ती काळात शासन तसा निर्णय घेऊ शकते. जुलैमध्ये पावसाळा टिपेला असला तरी त्यावेळची मोठी आपत्ती गृहीत धरून निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वेळेतच निवडणुका होतील असे दिसते.

उपायुक्तांची बदली निवडणुकीपर्यंत रोखली 
उपायुक्त सुनील पवार यांची अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून बदलीचे आदेश पालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तथापि पवार यांची बदली निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत करू नये, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शासनाला दिले आहेत. त्यामुळे तूर्त श्री. पवार यांना सांगलीतच थांबावे लागेल असे दिसते. राज्य आयोगाने बदली संबंधाने केलेला तातडीचा पत्रव्यवहार विचारात घेता निवडणूक वेळेतच होईल. असे स्पष्ट होते. 

दृष्टिक्षेपात
 एकूण ४ लाख २३ हजार मतदारसंख्या 
 एक मतदार चार उमेदवारांसाठी मतदान करणार 
 साडेसातशे ते आठशे मतदारांचे एक केंद्र 
 साडेपाचशेंवर मतदार केंद्रे, अडीच हजारांवर निवडणूक कर्मचारी 
 १५ मे पर्यंतच्या सर्व नोंद मतदारांची नावे यादीत असतील. 
 तीन ते चार प्रभागांसाठी तहसीलदार दर्जाचा एक निवडणूक अधिकारी 
 आचारसंहिता कक्ष व एकूण नियंत्रणासाठी दोन उपजिल्हाधिकारी 
दर्जाचे अधिकारी 

Web Title: sangli miraj kupwad municipal election preparation