सांगली : मिरजेत महापालिकेचे होणार ‘मॉडेल स्कूल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Miraj Municipal Corporation Model School

सांगली : मिरजेत महापालिकेचे होणार ‘मॉडेल स्कूल’

सांगली: मिरजेतील पंढरपूर रस्त्यावरील शाळा क्रमांक १९ मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहे. एक कोटी रुपये खर्च करून इमारतीस सर्व पायाभूत सुविधा वर्षभरात दिल्या जातील. पालिका कर्मचारी, शासन निधी, लोकसहभागातून विकसित होणारे शाळा विकासाचे हे प्रतिरूप पुढच्या काळात सर्व पालिका शाळांसाठी आधारभूत ठरेल, अशी ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, आभाळमाया फाउंडेशनचे विश्‍वस्त प्रमोद चौगुले यांनी दिली.

स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील, उत्तम साखळकर उपस्थित होते. शैक्षणिक दर्जा नाही म्हणून विद्यार्थी नाहीत किंवा विद्यार्थी नाहीत म्हणून ओस पडणाऱ्या शाळा काही वर्षातील वास्तव असताना वर्षभर पालिका शाळांच्या विकासासाठी पालिकेत छोटे-मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याला ठोस अशी दिशा देण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी स्वागतार्ह असे पाऊल टाकले आहे. ते म्हणजे मिरजेतील शाळा विकसित करण्याचे. शाळेच्या सुमारे दीड एकर परिसराला जूनपर्यंत पूर्ण कुंपण घातले जाणार आहे. दिवाळीपर्यंत विद्यमान इमारतीच्या विस्तारीकरणास सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर याच पद्धतीने टप्प्याटप्प्याने सर्व शाळांचा विकास होईल.

अशा असतील सुविधा

सर्व शाळांसाठी समान आणि एकमेव अशी ओळख सांगणारे प्रवेशद्वार, काटेरी सुरक्षा भिंत, खेळाचे मैदान, पुरेशी स्वच्छतागृहे, बगीचा-क्रीडांगण, सध्याच्याच इमारतीवर दुमजली विस्तार करून शाळाखोल्या, सर्व वर्गखोल्यांचे डिजिटायझेशन, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, कला-संगीत वर्ग, शाळेपर्यंत बसगाडीची सोय, बालवाडीसाठी स्वतंत्र वर्ग, खेळणी, सौर पॅनेलद्वारे शाळा ऊर्जा स्वयंपूर्ण, सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पिण्याचे पाणी, हँडवाश स्टेशन, कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प, प्लास्टिक संकलन केंद्र, जल फेरभरण, सुरक्षारक्षकांसाठी खोली, माध्यान्ह स्वतंत्र भोजनालय हॉल.

शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी...

सर्व शिक्षकांसाठी निरंतर प्रशिक्षण आणि शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी स्वतंत्र पद्धती, शैक्षणिक तज्ज्ञांच्या शाळा भेटी, आदर्श शाळांना शिक्षकांच्या भेटी, मानधनावर तसेच ट्युलीप योजनेतून सुमारे शंभरांवर शिक्षकांची नव्याने भरती, प्रत्येक वर्गाला किमान एक शिक्षक आणि अवांतर खेळ-कला वर्गांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती, महापालिका क्षेत्रात मध्यवर्ती विज्ञान केंद्र उभारणार.

काही वर्षांत गरीबच नव्हे, तर सर्व स्तरातील पालकांची पहिली पसंती पालिका शाळांनाच असेल, अशा आदर्शवत शाळा उभ्या करू. यावर्षी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी सर्व शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी खर्च होईल. हा निधी दरवर्षी वाढवत नेला जाईल. सन २०१९ मध्ये पालिका शाळांची पटसंख्या चार हजार ६०० होती. यंदा सहा हजार २०० झाली आहे. पुढच्या काही वर्षांत सर्व पालिका शाळा हाउसफुल्ल असतील.

- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

- नितीन कापडणीस, आयुक्त

Web Title: Sangli Miraj Municipal Corporation Model School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top