गणेशमूर्तीच्‍या ‘दृष्टी’सौंदर्याचा किमयागार...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मिरज - भक्तांना असंख्य रूपांत भेटणारा गणपती बाप्पा उत्सवाच्या अकरा दिवसांच्या काळात भक्तगणांवर विशेष कृपादृष्टी ठेवून असतो.

गणेशमूर्तीला ही ‘दृष्टी’ देण्याची किमया साधली आहे मिरजेतील रवी यादव या चित्रकाराने. मूर्तींचे डोळे रेखाटण्यात त्यांचा विशेष हातखंडा आणि कसब आहे. मूर्तिकार कोणीही असो, डोळे मात्र यादव यांनीच रेखाटायचे, अशी परंपरा ठरून गेली आहे. 

मिरज - भक्तांना असंख्य रूपांत भेटणारा गणपती बाप्पा उत्सवाच्या अकरा दिवसांच्या काळात भक्तगणांवर विशेष कृपादृष्टी ठेवून असतो.

गणेशमूर्तीला ही ‘दृष्टी’ देण्याची किमया साधली आहे मिरजेतील रवी यादव या चित्रकाराने. मूर्तींचे डोळे रेखाटण्यात त्यांचा विशेष हातखंडा आणि कसब आहे. मूर्तिकार कोणीही असो, डोळे मात्र यादव यांनीच रेखाटायचे, अशी परंपरा ठरून गेली आहे. 

बाप्पावर विशेष श्रद्धा असणारी भक्तमंडळी गणेशमूर्तीच्या देखण्या रूपाबरोबरच त्याच्या डोळ्यांतील भावही लक्षात घेऊन मूर्ती खरेदी करतात. मूर्ती कितीही देखणी, भव्य आणि मोठी असली तरी तिचा सगळा सारांश डोळ्यांत गोळा होतो. हे लक्षात घेऊन डोळे रेखाटावे लागतात. यादव यांनी गेल्या वीस-पंचवीस वर्षांत हजारो मूर्तींचे डोळे ‘जिवंत’ केले आहेत.

बोटांमधली नजाकत, रंग आणि आयुधांचा योग्य वापर, विविध देव-देवतांच्या मूर्तीचे डोळे आणि त्यातील भावभावनांचा अभ्यास याद्वारे यादव यांनी ही कला साध्य केली आहे. गणेशाचे डोळे रेखाटताना पासष्ट कलेच्या देवतांशी तादात्म्य पावल्याची भावना निर्माण होते, असे ते म्हणतात.

गणेशाने दिलेली कला त्यालाच अर्पण करण्याची ही अनोखी साधना यादव आपल्या बोटांतून प्रतित करतात. मूर्तींचे डोळे रेखाटण्यासाठी चित्रकार एरवी ब्रशचा वापर करतात. यादव मात्र पेन गन वापरतात. त्यामुळे डोळे आखीव-रेखीव येतात. भुवया, पापण्या उठावदार बनतात. बुब्बुळाची चमक, त्यातील भाव उठावदार होतात. गणपती बाप्पाकडे कोणत्याही अँगलमधून पाहिले तरी तो आपल्याकडेच पाहतोय, ही भावना भक्ताच्या मनात निर्माण होणे सर्वात महत्त्वाचे. गणेशाचे डोळे कोरताना ही गोष्ट प्रकर्षाने ध्यानी ठेवावी लागते. दोन्ही बाजूंचे डोळे एकसमान आकाराचे आणि बुब्बुळाचे गोलही एकाच आकाराचे असतील, याची दक्षता घ्यावी लागते. मोठ्या डोळ्यांतून उग्र भाव प्रकट होतात; तर बारीक डोळे मूर्तीच्या देखणेपणाच्या आड येतात.

अधोमुखी डोळे भक्तांशी संवाद साधू शकत नाहीत. गजाचे डोळे बारीक असतात, हा शास्त्रार्थदेखील ध्यानी ठेवावा लागतो. ही सगळी कसरत करतच डोळे साकारावे लागतात, असे यादव यांनी सांगितले. मूर्तींचे वैविध्य जपताना बुब्बुळांची रंगसंगती काळी, करडी, घारी आणि प्रसंगी निळ्या रंगाने केली जाते. ते शांत आणि प्रसन्न भासण्यासाठी रंगसंगतींचा योग्य वापर करावा लागतो. 

मिरजेत महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नोकरी करणाऱ्या रवी यादवांना गणेशोत्सव काळात सवड नसते. दिवसभर नोकरी आणि रात्रभर गणेशसेवा अशी धावपळ सुरू असते. शेवटच्या काही दिवसांत तर रजेशिवाय पर्याय नसतो. चित्रकला किंवा शिल्पकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नसलेल्या यादव यांनी अभ्यास आणि आवडीद्वारे डोळ्यांची कला साध्य केली. मूर्ती घडवताना किंवा साच्यातून बाहेर काढताना डोळ्यांची ठेवण योग्य नसेल तर रेखाटन करतेवेळी ॲडजस्टमेंट करावी लागते.

Web Title: sangli miraj news ganeshmurti