esakal | सांगली महापालिकेची घरपट्टीची शास्ती 100 टक्के माफ; वर्धापनदिनी भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Municipal Corporation's house rent penalty 100 percent waived; Anniversary gift

सत्ताधारी भाजपने महापूर आणि कोरोना संकटात झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना घरपट्टी शास्ती 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली महापालिकेची घरपट्टीची शास्ती 100 टक्के माफ; वर्धापनदिनी भेट

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सत्ताधारी भाजपने महापूर आणि कोरोना संकटात झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना घरपट्टी शास्ती 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपने घेतलेल्या निर्णयाचा प्रस्ताव बुधवारी (ता. 10) होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहे. ही सवलत 15 फेब्रुवारी ते 30 मार्च अखेर असेल. एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळणार असून घरपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन भाजपचे महापालिकेचे नेते शेखर इनामदार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने यांनी केले आहे.

बुधवारी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नगरसेवकांची बैठक झाली. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांनी या बैठकीत करवसुलीबाबत विविध सूचना मांडल्या. यात घरपट्टीच्या शास्तीचा विषय आला. त्यावर चर्चा करून शास्ती 100 टक्के माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

श्री. इनामदार म्हणाले,""महापालिका क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीला महापूर आला होता. सांगली आणि मिरज शहराला त्याचा मोठा फटका बसला. शेकडो कुटुंबे तसेच व्यापारी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. नागरिक, व्यापारी व संघटनांनी घरपट्टी माफ करावी किंवा त्यामध्ये सवलत मिळावी यासाठी निवेदन दिले. गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. परिणामी पुन्हा शहरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊनवर भर दिल्याने नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचेही मोठे हाल झाले. 

महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता महापालिकेच्या 23 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यासाठी मार्च 2021 पर्यंत एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना शास्तीमध्ये 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सांगितले. 

90 कोटी घरपट्टी थकीत 
महापालिकेच्या यंदाची थकीत घरपट्टी 42 कोटी आणि मागील थकबाकी 47 कोटी अशी सुमारे 90 कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. त्यापैकी 24 कोटींची वसुली आतापर्यंत झाली आहे. शास्ती, दंड माफीच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकरकमी घरपट्टी भरल्यास नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याने नगरसेवकांनी याची माहिती प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी. घरपट्टी भरण्यास प्रोत्साहन द्यावे. मार्चअखेरपर्यंत 50 कोटींची वसुली होऊ शकते. त्याचा फायदा नगरसेवकांना पुढील वर्षी कामांनाही निधी मिळू शकेल. 

कर भरलेल्यांनाही दिलासा 
महापालिकेचे भाजपचे गटनेते विनायक सिंहासने म्हणाले,""घरपट्टीच्या थकबाकीदारांना दरमहा दोन टक्के शास्ती आकारली जाते. ती माफ होणार आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल. मात्र त्यापूर्वीही ज्यांनी घरपट्टी भरली आहे, अशा नागरिकांनाही दिलासा देण्याचा विचार आहे''. 

संपादन : युवराज यादव