रात्रीस चाले खेळ उमेदवार यादीचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सांगली - उमेदवारी निश्‍चितीचे सर्वपक्षीय भिजत घोंगडे आज दिवसभर सुरू होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बर अक्षरश: दिवसभर गॅसवर होते. तिकडे भाजपची "आयकॉन इन हॉटेल'मधील खलबते टिपेला पोहोचली होती. सर्वात लक्षवेधी निर्णयात रात्री उशिरा महापौर हारुण शिकलगार यांना विश्रांतीचा सल्ला कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला. खणभागातून कॉंग्रेसकडून उत्तम साखळकर यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 

सांगली - उमेदवारी निश्‍चितीचे सर्वपक्षीय भिजत घोंगडे आज दिवसभर सुरू होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बर अक्षरश: दिवसभर गॅसवर होते. तिकडे भाजपची "आयकॉन इन हॉटेल'मधील खलबते टिपेला पोहोचली होती. सर्वात लक्षवेधी निर्णयात रात्री उशिरा महापौर हारुण शिकलगार यांना विश्रांतीचा सल्ला कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला. खणभागातून कॉंग्रेसकडून उत्तम साखळकर यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. 

आघाडी चर्चेस मध्यरात्री 
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा रात्री साडेनऊ वाजता बैठकीचा फेरा सुरू झाला. आपापल्या पक्षातील घोंगडी निस्तरून रात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कॉंग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम, माजी मंत्री सतेज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, गटनेते किशोर जामदार, राजेश नाईक, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, कमलाकर पाटील या नेत्यांची आघाडीचा निकाल करण्यासाठी बैठक सुरू झाली. प्रामुख्याने सांगलीवाडी, खणभाग, कुपवाड आणि मिरजेतील प्रभाग पाच आणि सहा हे आघाडीमधील वादाचे प्रभाग राहिले आहेत. त्याबाबतचा अंतिम फैसला न झाल्यास येथे मैत्रीपूर्ण लढती कराव्यात, अशी कॉंग्रेसकडून आग्रही मागणी आहे. 

भाजपची खलबते 
भाजपची हॉटेल "आयकॉन इन'मध्ये नेतेमंडळीची खलबते सुरूच होती. उद्या (ता. 11) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच अंतिम यादी जाहीर करून ए बी फॉर्म दिले जातील, असे सांगण्यात आले. यादी निश्‍चित होत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे खात्रीचे उमेदवारांची घोषणाही लांबणीवर पडली आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीनंतरच आयात मालावर निवडणूक लढवण्याची समीकरणे त्यांनी घातली आहेत. 

शिवसेनेचे 50 उमेदवार निश्‍चित 
शिवसेनेच्या वतीने आज राष्ट्रवादी व भाजपमधून आलेल्या कार्यकर्त्यांचे घाऊक पक्षांतराचा कार्यक्रम झाला. भाजपचे माधव गाडगीळ, मुग्धा गाडगीळ, शाम ठोंबरे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सज्जाद भोकरे यांनी शिवसेनेत स्वागत केले. 

महापौरांचे तिकीट कापले 
विद्यमान महापौर हारुण शिकलगार यांना कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी झटका दिला. आज दिवसभरात खण भागातून उत्तम साखळकर की महापौर याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शेवटचा प्रयत्न म्हणून शिकलगार यांनी मुस्लिम समाजातील शिष्टमंडळ नेत्या जयश्री पाटील यांच्या भेटीला पाठवले. अडीच वर्षे मानाचे पद दिले आहे. कुटुंबात एक उमेदवार देणार आहोत. त्यामुळे महापौरांनी आता थांबावे, असा निर्वाणीचा सल्ला श्रीमती पाटील यांनी दिला. 

Web Title: sangli municipal election