आघाडीची चर्चा फिस्कटली

Congress-Ncp
Congress-Ncp

मिरज - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय आजच्या बैठकीत तरी फिस्कटला आहे. याबाबतची पुन्हा आणि अंतिम चर्चा उद्या (ता. ४) नागपूर येथे होणार आहे. 

आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ कायम असून, येथे आज रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत अंतिम तोडगा निघू शकला नाही. दोन्ही पक्षांच्या शहर जिल्हाध्यक्षांसह नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’त आघाडी करण्याबाबत गेले काही दिवस प्रस्ताव आणि चर्चा सुरू आहे. काँग्रेसने ‘राष्ट्रवादी’ला २५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ‘राष्ट्रवादी’ने हा प्रस्ताव फेटाळला होता. काँग्रेसचे ३१ आणि ‘राष्ट्रवादी’चे २७ सदस्य महापालिकेत आहेत. त्या जागा सोडून उर्वरित २० जागांवर चर्चा करू, असा ‘राष्ट्रवादी’चा प्रस्ताव होता. मात्र, काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नाही. त्यामुळे आघाडीचे घोडे अडलेले आहे.

नागपूरमध्ये उद्या पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे तेथे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आघाडीबाबत निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. त्यात आघाडीचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, आज सायंकाळपासून 
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह किशोर जामदार यांच्या उपस्थितीत आघाडीबाबत चर्चा झाली. यातूनही काही निष्पन्न झाले नाही.

नऊ जागांवरून घोडे अडले
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, कुपवाडमधील प्रभाग एक, मिरजेतील प्रभाग पाच, सहा आणि सात, सांगलीवाडीतील प्रभाग १३ या जागांवर दोन्ही बाजूंनी दावा करण्यात येत आहे. त्यामुळे येथे घोडे अडले आहे.

आजपासून धूमशान; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
सांगली - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (ता. ४) पासून प्रत्यक्ष धूमशान सुरू होत आहे. ऑनलाईन अर्ज ११ जुलैपर्यंत भरतानाच ते अर्ज प्रत्यक्षात सादर करता येतील. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी या संपूर्ण प्रक्रियेची चित्रफितींसह जिल्हाधिकारी कार्यालयात आज कार्यशाळा घेतली. यावेळी आयुक्त रवींद्र खेबूडकर आणि उपनिवडणूक अधिकारी स्मृती पाटील उपस्थित होते.

महापालिकेतर्फे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार १२ जुलैला अर्जांची छाननी होईल. त्याचदिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. ता. १७ ला दुपारी २ पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. ता. १८ ला चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. एक ऑगस्टला मतदान आणि ता. ३ ऑगस्टला मतमोजणी असा एकूण निवडणूक कार्यक्रम आहे. त्यानुसार उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

अर्ज भरण्याची प्रक्रिया
 ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी  https : //panchayatelection.mahrashtra.gov.in  या संकेतस्थळावर जावे लागेल
 Candidat Registration या बटनावर click करून सुरवातीलाच उमेदवारांच्या नावाने वेबसाईट नोंदणी करून घ्यावी
 तेथे Login  Id व passward  तयार करून भरा व submit करावे
 परत याच साईटवरून लॉगीन आयडी व पासवर्ड भरून अर्ज भरावा.
 निवडणूक अर्ज भरण्याबाबत सेतू केंद्राच्या संचालकांना प्रशिक्षण देण्यात. 
 शेखर माने युथ क्‍लबतर्फे मोफत अर्ज भरण्याची व्यवस्था.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com