सांगली मनपासाठी गुन्हेगारांनी बांधले पॅड

अजित झळके
शुक्रवार, 30 मार्च 2018

पक्षांची आकतिकता ः पैशांसाठी टोळीबहाद्दरांना उमेदवारी देणार का?

पक्षांची आकतिकता ः पैशांसाठी टोळीबहाद्दरांना उमेदवारी देणार का?

सांगली: काल-परवापर्यंत ज्याचा फोटो वर्तमानपत्रात "मोका'मधील गुन्हेगार, खंडणीबहाद्दर, टोळीचा म्होरक्‍या म्हणून छापला गेला, तोच प्रभागाचा "भावी नगरसेवक' म्हणून आता चौकाचौकात डिजीटलवर झळकू लागला आहे. पोलिस दप्तरी गुन्ह्यांची मोठी यादी असलेल्यांनी या निवडणुकीसाठी पायाला पॅड बांधून तयारी सुरु केली आहे. काळ्या धंद्यातून जमवलेली भरमसाठ "माया' आणि त्या जोरावरच उमेदवारीचा दावा राजकीय पक्षांची आगतिकता उघड करणारा आहे. निवडणूक येणे हा एकच निकष लावून गुन्हेगारांना मैदानात उतरवले जाण्याची शक्‍यता आहे, मात्र सांगलीकर त्यांनी थारा देणार नाहीत.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचा आखाडा सज्ज आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्याने कोण, कुठे, कसा उमेदवार होऊ शकतो, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन प्रमुख पक्षांत येथे लढत होणार असून शिवसेना दखलपात्र तयारी करत आहे. सांगली सुधार समितीने भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून मशागत केली आहे. परिणामी, बहुरंगी लढतीसाठी चांगल्या उमेदवारांचा शोध घेणे, प्रभागात जातीय समीकरणे जमवून चार प्रबळ उमेदवार देणे, आव्हानात्मक काम आहे. अशावेळी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या तरुणांना एकत्र बांधून त्या जोरावर उमेदवारीचा दावा करणारे "इच्छुक नग' वाढले आहेत. मटका, खंडणीसह अन्य गुन्ह्यांतून या टोळ्यांनी मोठी माया जमवली आहे. प्रभागात दहशत माजवून सामान्य लोकांवर आपला प्रभाव असल्याचे चित्र निर्माण केले आहे. त्यांचे निवडून येण्याचे "मूल्य' सर्वाधिक असल्याचा दावा केला जातोय. त्या जोरावर त्यातील काहांनी "भावी नगरसेवक' म्हणून पोस्टरही लावले आहेत. याआधी अशाच पद्धतीने महापालिकेत प्रवेश केलेल्या गुंड नगरसेवकांचे अनेक दाखले देता येतील.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली होती. त्याचा मोठा झटका पक्षाला सहन करावा लागला. त्यावेळी दिवंगर आर. आर. पाटील यांना प्रचारात भाषण करताना पंचाईत झाली होती. त्यांनी एका पत्रकार परिषदेत "सर्वच पक्षांत गुन्हेगार उमेदवार आहेत', असा दावा करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. सांगलीकरांनी अपवाद वगळता बहुतांश गुन्हेगारांना त्या निवडणुकीत अद्दल घडवली होती. यावेळी पुन्हा एकदा गुन्हेगार उमेदवार समोर असणार आहेत. त्यांच्याकडून साम, दाम, दंड, भेद या साऱ्या तंत्राचा वापर केला जाण्याची तयारी आहे. विशेष म्हणजे या लोकांना राजकीय पक्ष उमेदवारी देतात कशी, याबाबत सांगलीकरांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी हे पक्ष काहीतरी धडा घेतील आणि शहरांच्या विकासाचे व्दार जेथे उघडते, त्या महापालिकेला "कलंकित' कारभाऱ्यांपासून वाचवतील, अशी सांगलीकरांची अपेक्षा आहे.

मोका अन्‌ मौका
सांगली शहरातील सावंत टोळीला अलिकडेच मोका लावण्यात आला आहे. त्या टोळीचा म्होरक्‍या सचिन सावंत यंदाही प्रबळ दावेदार मानला जातोय. त्याआधी कुख्यात गुंड दाद्या सावंत याने निवडणूक जिंकली होती. त्याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. माधवनगर रस्त्यावर आता एका गुन्हेगाराचे पोस्टर झळकू लागले आहेत. अर्थात, साऱ्यांच्या कुंडल्या राजकीय पक्षांकडे आहेत. "मोका'पात्र गुन्हेगारांना राजकीय "मौका' द्यायचा का, हे त्यांनी ठरवावे, सांगलीकर मात्र त्यांना थारा देणार नाहीत, असेच संकेत आहेत. अर्थात राजकीय पक्षाच्या नेत्यांना याचे भान हवे.

Web Title: sangli municipal election and criminal leader