भेटी, फेऱ्या, कोपरा सभांचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

सांगली-मिरज - महापालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वपक्षीय उमेदवारांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा संपर्क भेटी प्रचार फेऱ्यांवर तर भाजपचा सभावर जोर आहे. प्रचाराचे अवघे पाच-सहा दिवसच उरले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्याची खटपट सुरू आहे. पावसाने उघडीप  दिल्याने दमछाक होईपर्यंत मतदार पळत आहे.

सांगली-मिरज - महापालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वपक्षीय उमेदवारांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा संपर्क भेटी प्रचार फेऱ्यांवर तर भाजपचा सभावर जोर आहे. प्रचाराचे अवघे पाच-सहा दिवसच उरले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्याची खटपट सुरू आहे. पावसाने उघडीप  दिल्याने दमछाक होईपर्यंत मतदार पळत आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मोठे प्रभाग मोठे आणि चार-चार उमेदवार यामुळे त्रेधा उडाली आहे. एरवी शहरातील काही गल्ल्यांत प्रचाराची सवय असलेल्या उमेदवारांना यंदा विस्तारित भागात सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. पावसाने गुंठेवारीत गुडघाभर चिखलातून जाऊन मतदारांशी संपर्क करावा लागत आहे. मात्र शहरात पावसाच्या उघडिपीमुळे दिलासा मिळाला आहे. भाजप, शिवसेना या  प्रमुख पक्षांनी जाहीर सभांद्वारा वातावरण निर्मिती केली. भाजपचा सरासरी दररोज एखादा मंत्री किंवा आमदार शहरात फिरत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ पहिल्या फळीतील प्रचारक आहेत. 

पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार भाई गिरकर यांनीही संपर्क सुरू ठेवला आहे. प्रत्येक प्रभागात संपर्क कार्यालयांची धडाकेबाज उद्‌घाटने करून वातावरण निर्मिती केली आहे. खासदार संजय पाटील यांनी मात्र मिरजेत भेटी दिलेल्या नाहीत.

काँग्रेसकडून सतेज पाटील, जयश्री पाटील, प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील,  विश्‍वजित कदम यांनी कालपासून शहर पिंजून काढले आहे. 

शिवसेनेने शरद पोंक्षे या स्टार प्रचारकाला आणून बार उडवून देण्याचा प्रयत्न केला. पुढील आठवड्यात  अभिनेते आदेश बांदेकर येणार आहेत. या सर्वांवर कडीचा प्रयत्न एमआयएमने केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अससुद्दीन ओवेसी यांची सभा शुक्रवारी आयोजित केली आहे. सोबतीला वारीस पठाण, अकबरुद्दीन ओवेसी हे एमआयएमचे आमदार असतील.

काँग्रेसचा ‘घर टू घर’ संपर्क
काँग्रेस आघाडीने एक-दोन जाहीर सभा घेतल्यानंतर घर  टू घर संपर्कावर भर दिला आहे. जयंत पाटील कोपरा  सभा घेत आहेत. डॉक्‍टर, वकील अशा विशिष्ट गटांशी संपर्काची त्यांची नेहमीची पद्धत सुरू आहे. सोबतीला पक्षाचे शिलेदार आहेत. 

Web Title: sangli municipal election candidate meeting speech rally politics