सांगलीत मनपा निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी नियुक्तीचा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

महापालिका निवडणुकीत उपजिल्हाधिकारी नियुक्तीवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगली महसूल विभागातील सहा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवडणूक कामी नियुक्त केले आहेत. त्याचा परिणाम महसूली कामांवर होऊ शकतो. त्यामुळे सोलापूर, पुणे जिल्ह्यातील एकेक अधिकारी घेता येईल का, हा पर्याय पडताळून पाहण्याबाबत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी पत्र लिहले आहे. 
 

सांगली - महापालिका निवडणुकीत उपजिल्हाधिकारी नियुक्तीवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगली महसूल विभागातील सहा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवडणूक कामी नियुक्त केले आहेत. त्याचा परिणाम महसूली कामांवर होऊ शकतो. त्यामुळे सोलापूर, पुणे जिल्ह्यातील एकेक अधिकारी घेता येईल का, हा पर्याय पडताळून पाहण्याबाबत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी पत्र लिहले आहे. 

जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पंधरा जागा आहेत. पैकी दोन जागा रिक्त असून 13 अधिकारी नियुक्त आहेत. त्यापैकी दहा अधिकारी मुख्यालयात म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात अजून तीन प्रांतही त्या दर्जाचे आहेत. आयुक्तांनी निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त 5 आणि मिरजेचे प्रांत अशा एकूण सहा लोकांची नियुक्ती केली आहे. यापैकी काही अधिकाऱ्यांकडे सध्या अतिमहत्वाची कामे सुरु आहेत. किरण कुलकर्णी या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेचे काम पाहत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी भानूदास गायकवाड यांच्याकडे बायोमेट्रीक पद्धतीच्या अंमलबजावणीचे काम आहे. मिरजेचे प्रांत विकास खरात यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी आज अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांचीही भेट घेऊन चर्चा केली. त्यात मार्ग काढता येईल का, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पत्रव्यवहार सुरु झाला आहे. 

दरम्यान, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचाही महापालिकेत गोंधळ उडाल्याची माहिती आहे. तीनपैकी दोन अधिकाऱ्यांबाबत संभ्रमावस्था असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निवडणुकीआधी अधिकारी नियुक्तीचा गोंधळ मनपात सुरु आहे.

Web Title: in Sangli municipal elections problems created for deputy collecor