Sangli: कृष्णेत विष कसं मिसळलं? अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण Sangli Municipality Notice Chemical water krishna river pollution | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

krishna river pollution

Sangli: कृष्णेत विष कसं मिसळलं? अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याची रसूलवाडी, सांबरवाडीला जाणारी पाईपलाईन फुटून रसायनयुक्त पाणी शेरीनाल्यातून कृष्णा नदीत मिसळल्याने मृत माशांचा खच आढळला. अंकली पुलाखाली माशांचा प्रचंड खच तरंगत आल्यावर दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उजेडात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी दत्त इंडिया कंपनी आणि महापालिकेला नोटीस बजावली आहे.

कृष्णा नदीत वर्षभरात तिसऱ्यांदा लाखो माशांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी १७ जानेवारीला मासे मृत झाले होते. त्यामुळे सांगलीकरांतून आज संतापाची लाट उसळली. दुपारी एकच्या सुमारास अंकली पुलावर वाहने थांबवून लोक पात्राकडे पाहू लागले. लाखो मासे पाण्यावर तरंगत येत होते परिणामी वाहतूक कोंडी झाली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे यांनी अंकलीत पाहणी करून हरिपूर गाठले. तेथे काहीच मागमूस नव्हता. त्यामुळे हरिपूर ते अंकली या दरम्यान कुणीतरी रसायनयुक्त पाणी सोडले होते का, यादृष्टीने तपास झाले.

तसे आढळले नाही. रात्री कोयना धरणातून सोडलेले पाणी आणि त्यातून काही गडबड झाली आहे का, याचा शोध घेत असताना दत्त इंडिया (वसंतदादा कारखाना) कंपनीची पाईपलाईन फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आणि मृत माश्‍यांच्या कारणाचा छडा लागला.

रसायनयुक्त पाणी कृष्णेत कसे आले?

वसंतदादा साखर कारखाना रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी रसूलवाडी आणि सांबरवाडी येथील शेतीला पाठवतो. या पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जाते का, याविषयी संशय व्यक्त केला जातोय. काल ती पाईपलाईन फुटली आणि माधवनगरकडून सांगलीत शेरीनाल्याला जोडणाऱ्या गटारीतून हे रसायनयुक्त पाणी आले. शेरीनाला सांगली बंधाऱ्याच्या दक्षिणेला कृष्णेत मिसळतो.

तेथे या पाण्याचा डोह साचला. रात्री उशिरा कोयना धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यातून खाली आले आणि त्यात रसायनयुक्त पाणी मिसळून ते हरिपूर येथील संगमाजवळ गेले. रात्रीत तेथील मासे मृत होऊन आज दुपारी तरंगत अंकलीपर्यंत पोहोचले. इकडे हरिपूरमधून तो लोंढा पुढे निघून गेल्याने दुपारी हरिपूरमध्ये त्याचा लवलेश नव्हता.

माणसं की राक्षस ?

कृष्णा नदीच्या पात्रात जे काही घडते आहे ते नैसर्गिक नाही. ते मानवनिर्मित आहे. हे घडवणारी माणसं आहेत की राक्षस, असा प्रश्‍न पडावा, इतकी गंभीर स्थिती आहे. केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही. या प्रकरणात सांगलीकरांना रस्त्यावर उतरावे लागेल. कृष्णा नदी ‘पंचगंगा’ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. कोयना धरणातून सोडलेला पाण्याचा प्रवास खळाळत पुढे निघून जातो आणि पाप धुवून काढतो, अन्यथा कृष्णा नदी विषवाहिनी व्हायला वेळ लागणार नाही.

पोती भरून मासे नेले

कृष्णा नदीच्या प्रवाहावर तरंगत आलेले हजारो मासे गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. हातात पोती होती. ती भरून मासे नेले जात होते. ते विकायला बाजारात आणले होते. मृत्यूकडून मृत्यूकडे जाणारा हा प्रकार घडत होता. ही बातमी सांगलीभर पसरली असल्याने सुदैवाने मासे कुणी विकत घेतले नसावेत, अशी अपेक्षा आहे. ज्यांनी मासे गोळा करून नेले त्यांनी ते खाल्ले तरी आरोग्याचा धोका आहे.

योगायोग की टायमिंग?

कृष्णा नदीच्या पाण्याला मळीचा वास येतोय, असे दोन दिवसांपासून लोक सांगत होते. पहिली बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. याकडे दोन दिवसांत दुर्लक्ष झाले का? वसंतदादा कारखान्याची पाईपलाईन काल रात्री फुटली की त्याआधी? कालच कोयना धरणातून पाणी सांगलीत येणार हे स्पष्ट होते.

दोन्ही घटनांचा निव्वळ योगायोग होता की ‘टायमिंग’ साधले गेले? असे प्रश्‍न विचारणे गरजेचे आहे. कारण, कृष्णा नदीच्या काठावरील अनेक कारखाने नदीच्या प्रवाहात रात्रीत मळीमिश्रित पाणी सोडत आले आहेत. त्याबाबतचा एक सविस्तर अहवाल हरित लवादाकडे नुकताच सादर झाला आहे. त्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष असेल.

‘जलसंपदा’चे नियोजन मुळावर

कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्याने सांगलीला पुढील आठ दिवस पाणी टंचाई जाणवणार आहे. ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती उद्‍भवण्यामागे जलसंपदा आणि महापालिकेमधील गैरमेळ कारणीभूत असल्याचे दिसून येते. असा गैरमेळ झाल्याने मासे मृत झाले आहेत. रोज सरासरी २२०० क्युसेक पाणी कोयनेतून सोडले जाते.

हे पाणी कमी झाले आणि काल सायंकाळनंतर अचानकपणे डिग्रज बंधाऱ्यातून पाणी अधिकचे सोडले गेले. गेल्या आठवडाभरात सांगली बंधाऱ्याखाली हरिपूर हद्दीत तुंबलेले रसायनमिश्रित पाणी पुढे पास झाले आणि ते माश्‍यांचा मुळावर उठल्याचा अंदाज आहे.

वसंतदादा साखर कारखान्याची पाईपलाईन फुटून शेरीनाल्यातून पाणी कृष्णा नदीत मिसळल्याचे स्पष्ट झाले आहे. दत्त इंडिया कंपनी आणि महापालिकेला आम्ही नोटीस बजावली आहे. याबाबतचा अहवाल तातडीने प्रादेशिक कार्यालयाला पाठवला आहे.

- नवनाथ औताडे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ