
सांगलीत नागपंचमी भक्तिमय वातावरणात
सांगली महिलांचा श्रावणातील महत्त्वाचा सण नागपंचमी. शहर आणि परिसरात नागपंचमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. दोन वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. त्यात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. माळी गल्लीतील नागराज सांस्कृतिक मंडळाने ढोल-ताशांच्या गजरात सकाळी नदीचे पाणी आणून अभिषेक केला. यावेळी महिलांनी भक्तिभावाने मातीच्या नागमूर्तींची पूजा केली.
दूध, लाह्या व गोड नैवेद्य अर्पण करून महिलांनी पूजा केली. सकाळपासूनच अर्बन बॅंकेजवळ, हिराबाग कॉर्नर गणपती मंदिराजवळ व गावभागात गर्दी होती. सकाळच्या टप्प्यात पूजा करून सायंकाळच्या टप्प्यात महिलांनी विविध खेळांची मजा लुटली. त्यानंतर आरती झाली.
माळी गल्लीत नागराज सांस्कृतिक भवन ट्रस्टतर्फे मंदिराला आकर्षक रोषणाई केली होती. ट्रस्टतर्फे पूजा महोत्सवात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथे महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. भक्तांना लाडूंचे वाटप करण्यात आले. मसाले दूध करून भक्तांना वाटप केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे विलासराव माळी, विठ्ठल माळी, विक्रांत माळी, आनंदराव माळी, भाऊसाहेब माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
लेफ्टनंट जन. एस. पी. पी. थोरात अकॅडमीच्या वतीने शांतिनिकेतन कॅम्पसमध्ये नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘शांतिनिकेतन’च्या संपूर्ण परिसरात पन्नासहून अधिक नागांच्या प्रतिकृती आकर्षक पद्धतीने लावून सजावट करण्यात आली होती. तसेच अप्रतिम पिंडाची व मध्यवर्ती ठिकाणी वारुळाची मोठी प्रतिकृती साकारण्यात आली होती. या सणाच्या निमित्ताने लोकरंगभूमी येथे विद्यार्थी-पालक भेट व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. अकॅडमीच्या इन्चार्ज समिता पाटील, उपसंचालक डी. एस. माने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी महिलांसाठी झिम्मा-फुगडी, झोक्यावर झोके घेत विविध खेळ सादर करत आनंद व्यक्त केला. संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, संजय खांडेकर, महेश पाटील, मोनिका करंदीकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शक्कल लढवली; हजार लिटर दूध वाचले!
सांगली नागपंचमीला श्रद्धेपोटी नागोबाच्या मूर्तीला दूध पाजले जाते. मात्र ते सारे दूध जमिनीवर पडून वाहून वाया जाते. एकीकडे दुधाअभावी गरीब कुटुंबातील मुलांचे कुपोषण होते. सांगलीतील राम मंदिरजवळील नागोबा मंदिरात मात्र काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी भाविकांना आवाहन करून शक्कल लढवत हे सारे दूध वाचवले आहे.
पिंपाला धोतराचे फडके गुंडाळून त्यात स्टीलची नागोबाची मूर्ती ठेवली. मंदिरातील मुख्य मूर्तीला फक्त दुधाचा नैवद्य दाखवायचा आणि पिंपातील मूर्तीला अभिषेक करावा, असे भाविकांना आवाहन केले. भाविकांनीही ते मानले. असे साठलेले दूध तापवून त्यामध्ये केशर, साखर, मसाला घालून ते सर्व येणाऱ्या भक्तांना वाटप केले. असे अन्यत्रही करता येईल. त्यातून हजारो लिटर दूध वाचेल.
Web Title: Sangli Nagpanchami Devotional Atmosphere
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..