कर्नाटकात वाहून गेले शंभर टीएमसी पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सांगली जिल्ह्यात चिंता - सिंचन योजनांसाठी दबाव

सांगली जिल्ह्यात चिंता - सिंचन योजनांसाठी दबाव
सांगली - कृष्णा नदीतून यंदा जूनपासून आतापर्यंत सुमारे 100 टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. सध्या कोयना, वारणा (चांदोली) धरणांतून सोडलेले पाणीही कर्नाटकात वाहून जात आहे. या स्थितीत जिल्ह्यात मात्र टंचाईच्या झळा वाढू लागल्या असून, ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी दबाव वाढू लागला आहे.

खरीप शंभर टक्के वाया गेला. हाती काहीच लागणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याची आता नजरअंदाज पाहणी सुरू होईल. पैसेवारी काढली जाईल. गेल्या दोन वर्षांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त होती. यंदा ती कमी असेल, असे चित्र आहे. या काळात राज्य शासनाने तातडीने उपसा सिंचन योजना कार्यक्षेत्रात पाणीपुरवठ्यासाठी आदेश द्यावेत, यासाठी आमदार, खासदारांकडून पाठपुरावा अपेक्षित आहे. लोकांनी ताकदीने तशी मागणीही केली. दुष्काळी टापूतील तलाव भरून घेतले तरी कर्नाटकात फुकटात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला कामी येऊ शकेल.

या टापूत द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि अन्य बागायती पिके धोक्‍यात आली आहेत. किमान एक आवर्तन फिरले तरी भूजलसाठ्यात चांगली वाढ होऊन परतीच्या पावसापर्यंत तग धरणे शक्‍य होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

- कोयनेतून विसर्ग - 2100 क्‍युसेक
- चांदोलीतून विसर्ग - 1600 क्‍युसेक
- राजापुरातून कर्नाटकात विसर्ग - 25 हजार ते 30 हजार क्‍युसेक

Web Title: sangli news 100 tmc water go to karnataka