‘म्हैसाळ’ला कृष्णा खोरेतून ३० कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कोंडी फोडण्यात अखेर बुधवारी (ता. २१) मध्यरात्री यश आले. मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा कृष्णा खोरेच्या पाणीपट्टीतून वीज बिलाचे पैसे भरण्याचे मंजूर केले. सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. 

सांगली - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कोंडी फोडण्यात अखेर बुधवारी (ता. २१) मध्यरात्री यश आले. मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा कृष्णा खोरेच्या पाणीपट्टीतून वीज बिलाचे पैसे भरण्याचे मंजूर केले. सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यासाठीची उर्वरित प्रक्रिया काल सुरू होती. उद्यापर्यंत पैसे महावितरणकडे वर्ग होतील आणि योजना कार्यान्वित होईल, अशी माहिती खासदार पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांनी दिली. 

म्हैसाळ योजनेच्या ३४ कोटी रुपये थकीत वीज बिलामुळे कोंडी झाली आहे. टेंभू, ताकारी योजना सुरू होऊन दीड महिना उलटला, मात्र चार तालुक्‍यांचे लाभक्षेत्र असलेल्या ‘म्हैसाळ’च्या थकबाकीची मुद्दा कसा सुटणार, हे कोडे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या  आठवड्यात ५० कोटींच्या निधीला सकारात्मक प्रतिसाद देत तशी टिपणी लिहिली होती, मात्र फाईल मार्गी लागली नाही. आपत्ती निवारणातून निधीसाठीचे प्रयत्न सुरू झाले, मात्र त्यात एका फाईलला दुसरी फाईल वाढत निघाल्याने कोंडी झाली. परिणामी, म्हैसाळला पैसे कशातून  मिळणार, असा तिढा निर्माण झाला होता. त्यावर कृष्णा खोरेकडे शिल्लक असलेल्या पाणीपट्टीच्या निधीतून तरतुदीवर चर्चा आली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत खासदार पाटील यांच्या बैठकांचा फेर सुरू झाला. त्यात काही काळ ताणाताणीही झाली,  खासदार पाटील, आमदार खाडे यांनी प्रसंगी राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतली होती. अखेर श्री. महाजन  यांनी कृष्णा खोरेच्या शिल्लक दोनशे कोटींतून ३० कोटी देण्याची तयारी दर्शवली आणि कोंडी फुटली. 

दोन दिवसांत उर्वरित प्रक्रिया
खासदार पाटील म्हणाले,‘‘मुख्यमंत्र्यांनी संकट काळात अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन ‘म्हैसाळ’साठी साथ दिली. काही आर्थिक अडचणी आल्या, मात्र त्यावर मार्ग काढत गिरीश महाजन यांनी निधी मंजूर केला आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील शेती संकटात असताना मागे हटून चालणारे नव्हते. दिल्लीत अधिवेशन सोडून मुंबईत तळ ठोकला होता. त्याला शेवटी यश आले, दोन  दिवसांत उर्वरित सर्व प्रक्रिया पूर्ण होतील.’’
आमदार खाडे म्हणाले,‘‘येत्या दोन दिवसांत उर्वरित  विषय मार्गी लागून योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’’

Web Title: Sangli News 30 cores to Mahishal from Krushna Khore