तिसावे सावरकर साहित्य संमेलन लक्षवेधी करूया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

सांगली - तिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन सांगली व मिरज शहरांचा उत्सव करूया, असा निर्धार आज संयोजन समितीच्या आढावा बैठकीत करण्यात आला. संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणारी शोभायात्रा, संमेलनाचे दोन दिवस आणि त्या अनुषंगाने करायची कामे, याचे क्षणाक्षणाचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची आज प्राथमिक बांधणी करण्यात आली. 

सांगली - तिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन सांगली व मिरज शहरांचा उत्सव करूया, असा निर्धार आज संयोजन समितीच्या आढावा बैठकीत करण्यात आला. संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणारी शोभायात्रा, संमेलनाचे दोन दिवस आणि त्या अनुषंगाने करायची कामे, याचे क्षणाक्षणाचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची आज प्राथमिक बांधणी करण्यात आली. 

आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी उपमहापौर शेखर इनामदार, भाजपचे सरचिटणीस मकरंद देशपांडे, माधव कुलकर्णी, ज्येष्ठ नेते बापूसाहेब पुजारी, बाळासाहेब देशपांडे, भारती दिगडे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. येत्या २१ व २२ एप्रिल रोजी विश्रामबाग येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या क्रीडांगणावर संमेलन होणार आहे. २० रोजी सायंकाळी गावभाग, विश्रामबाग आणि मिरज या तीन ठिकाणी एकाच वेळी शोभायात्रा काढून वातावरण निर्मिती केली जाईल.

गावभागात शोभायात्रा सांगतेला ‘मी येसूबाई बोलतेय’ हा प्रेरणा लांबे यांचा एकपात्री प्रयोग, विश्रामबागला सांगतेवेळी ‘सहा सोनेरी पानांचा इतिहास’ यावर गीता उपासनी यांचे व्याख्यान आणि मिरजेत सांगतेवेळी ‘आज सावरकर असते तर’ या विषयावर शंतनू राठी यांचे मार्गदर्शन होईल, असे जाहीर करण्यात आले. 

याशिवाय, महत्त्वाचे वक्ते निश्‍चित झाले असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असे सांगण्यात आले. 

बाळासाहेब देशपांडे यांनी आजवरच्या तयारीसह जमलेल्या निधीचा आढावा घेतला. वेळ आणि निधी उभारणी या दोन्ही पातळीवर अधिकाधिक काटेकोर नियोजन करण्याला प्राधान्य देऊ, तरुणांना सहभागासाठी प्रवृत्त करू, शोभायात्रेतून महिलांची एकता दाखवू, अशी सूचना त्यांनी मांडली. माधव कुलकर्णी यांनी मंडप, व्यासपीठापासून ते वक्‍त्यांचे नियोजन व अन्य कामांसाठीच्या समितीच्या कशा असाव्यात, कुणी कशामध्ये सहभाग घ्यावा, यावर मार्गदर्शन केले.  आमदार श्री. गाडगीळ, श्री खाडे व श्री. देशमुख यांनी निधी संकलनासह कार्यकर्त्यांप्रमाणे आम्ही झोकून देऊ, अशी ग्वाही दिले. शेखर इनानदार यांनी विश्रामबागची शोभायात्रा लक्षवेधी करण्याचा वीडा उचलला. 

खासदार बनसोडे उद्‌घाटक
या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक दा. वा. नेने अध्यक्षपद भूषवणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर पहिल्या दिवशी उपस्थित राहून चर्चासत्रात सहभाग घेणार आहेत. ठाणे आणि रत्नागिरीत झालेल्या संमेलनापेक्षा अधिक उंचीचे हे संमेलन व्हावे, यासाठी प्रयत्न करू, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.

Web Title: sangli news 30th ssavarkar sahitya sammelan