सांगलीत मोटारीतून ४० लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सांगली -  शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकाजवळ बुधवारी दुपारी एका गाडीतून घेऊन जात असलेली ४० लाख रुपयांची रोकड आज संजयनगर पोलिसांनी पाठलाग करून पकडली. या वेळी पोलिसांनी गाडीत असलेले काननवाडी (ता. मिरज) येथील सरपंच अनिल शेगुणशे यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर या रकमेबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी - संजयनगर पोलिस ठाण्याचे एक पथक आज दुपारी दीडच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना एक मोटार (एमएच १० बीजे १००८) थांबलेली दिसली. पोलिसांनी गाडीचे मालक अनिल शेगुणशे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिकीत एका पिशवीत नवीन पाचशे रुपयांची प्रत्येकी शंभर नोटांची ८० बंडले आढळून आली. ही एकूण ४० लाखांची सर्व रक्कम पोलिसांनी जप्त केली.

संजयनगर पोलिसांनी कारसह अनिल शेगुणशे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे उशिरापर्यंत चौकशी केली. त्यांनी आपण इस्टेट एजंट असून ही रक्कम आपलीच असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी प्राप्तिकर आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना या रकमेची माहिती दिली. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदेवे, सहायक निरीक्षक प्रशांत पाटील, उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले, दिनेश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

माहिती देण्यास टाळाटाळ
संजयनगर पोलिसांनी दुपारी दीडच्या सुमारास ही रोकड जप्त केली होती. मात्र त्याची माहिती देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत होती. पोलिस ठाण्याला आज जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची पाहणी होती. त्यामुळे माहिती देण्यात उशीर झाला, असे सांगण्यात येत होते.

Web Title: Sangli News 40 lakh cash seized from the car