पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील 6 दुकाने फोडली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

सांगलीः वर्दीतील क्रौर्याने सध्या राज्यभर अब्रूचे धिंडवडे निघालेल्या शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील गणपती पेठेतील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली. एका माळेतील ही दुकाने फोडून त्यातील सुमारे पंचवीस हजार रुपयांची रोकड तसेच 35 किलो बदाम लंपास केला.

सांगलीः वर्दीतील क्रौर्याने सध्या राज्यभर अब्रूचे धिंडवडे निघालेल्या शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील गणपती पेठेतील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली. एका माळेतील ही दुकाने फोडून त्यातील सुमारे पंचवीस हजार रुपयांची रोकड तसेच 35 किलो बदाम लंपास केला.

शहरातील फुटकळ भुरट्या चोऱ्यांनी नागरिक त्रस्त आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असता चोर सोडून तिसऱ्यालाच अडकवण्याचे शहर पोलिसांचे कारनामे उघडकीस आले असाताना आता पुन्हा एकदा गणपती पेठेतील सहा दुकाने फोडण्यात आली. दुकानांमध्ये फारशी रोकड अथवा किंमती ऐवज नव्हता. ही दुकाने हार्डवेअर, घाऊक किराणा व भुसार, कापूर, सुका मेव्याची आहेत. त्यातील एका दुकानातील वीस हजार रुपये तसेच अन्य दुकानातील किरकोळ रोकड चोरीस गेली आहे. सुका मेव्याच्या दुकानातील 25 किलो बदामाचे पॅकबंद पोते तसेच सुट्या स्वरुपातील दहा किलो बदामाचे पोते गायब केले आहे. मध्यरात्री अडीचच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, आज (गुरुवार) सकाळी शहर पोलिस उपाधीक्षक दीपाली काळे, शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र शेळके यांनी भेट दिली. श्‍वानपथक मागवण्यात आले. तपासाचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. शहर पोलिस ठाण्याचा सारा परिसर वर्दळीचा आणि व्यापार पेठेचा आहे. या परिसरात सराफ कट्टा परिसरात, कर्नाळ रस्त्यावर, आमराईजवळ पोलिस चौक्‍या आहेत. कर्नाळ व आमराई जवळची चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. शहरातील गस्तही आता रोडावली आहे. वर्दळीच्या भागात सीसीटीव्ही बसवण्याच्या घोषणाही पोकळ ठरल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर पुन्हा या साऱ्या उपायांची केवळ चर्चा होते. आज सकाळीही जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत या सर्व मुद्यांची चर्चा केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: sangli news 6 shops broken near police station