‘स्वाईन फ्लू’ने सात दगावले; दक्षतेची गरज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

सांगली - ‘स्वाईन फ्लू’ने जिल्ह्यात सात  महिन्यांत सात जणांचा बळी गेला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही बळींची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या आजारातून बरे होऊ शकतो असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते.

सांगली - ‘स्वाईन फ्लू’ने जिल्ह्यात सात  महिन्यांत सात जणांचा बळी गेला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही बळींची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या आजारातून बरे होऊ शकतो असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते.

इन्फ्लुएन्झा ए एच १ एन १ या विषाणूमुळे स्वाईन फ्लू आजार होऊ शकतो. साध्या तापाप्रमाणे हा आजार असतो. तसेच लक्षणे देखील तीच असतात. वृद्ध, लहान मुले यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना दक्षता घ्यावी लागते. तसेच इतर कोणताही आजार असताना स्वाईन फ्लू झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आपल्या भागात आढळू लागले आहेत. आजारामुळे अनेकजण दगावले आहेत. पावसाळ्यातील वातावरणात हा आजार अधिक पसरतो असे चित्र दिसून येते. यंदा जानेवारीपासून सात महिन्यांत शासकीय आकडेवारीनुसार २७ जणांचे ‘स्वॅब’चे नमुने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा पुणे येथे पाठवले. त्यापैकी ११ जणांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. तर कडेगाव तालुक्‍यातील दोघांचा कराड परिसरात उपचार घेताना मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत सातजणांचा बळी गेला.

स्वाईन फ्लू म्हणजे काय ?
स्वाईन फ्लू हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तापासारखा आजार आहे. स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णापासून सहा फुटांपर्यंत कोणी संपर्कात आला तर विषाणूमुळे दुसऱ्याला त्याची लागण होऊ शकते.
 

भीती पसरवू नका
स्वाईन फ्लूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना किंवा इतर आजार असताना स्वाईन फ्लू झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ देऊ नका. काळजी घेतल्यास स्वाईन फ्लू बरा होऊ शकतो.
- डॉ. संजय साळुंखे (जिल्हा शल्यचिकित्सक)

काळजी कशी घ्याल
खोकताना किंवा शिंकताना हातरुमाल वापरा; तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. हात सतत स्वच्छ धुवा. भरपूर पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. पुरेशी झोप घ्या. परदेशातून किंवा दूरच्या  प्रवासातून आल्यानंतर पुरेशी विश्रांती घ्या. फ्लूची लक्षणे असल्यास मास्क किंवा रुमाल वापरा. 

लक्षणे
ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, सर्दी, डोकेदुखी, नाक वाहणे आणि श्‍वास घेताना त्रास होणे. अतिसार व उलट्या होणे, तीन दिवसांहून अधिक काळ ताप असणे, शुद्ध हरपणे किंवा धाप लागणे ही स्वाईन फ्लू ची लक्षणे आहेत.

आजारी असाल तर

घरी विश्रांती घ्या. शक्‍य तितक्‍या कमी लोकांशी संपर्क ठेवा. पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात प्या. कुटुंबात किंवा शेजारील जर कोणी प्रवास करून आलेले रुग्ण आढळल्यास त्वरित सरकारी दवाखान्याशी संपर्क साधा.
 

दक्षता घ्या
सार्वजनिक ठिकाणी हस्तांदोलन, आलिंगन किंवा स्पर्शाने अभिवादन करणे टाळा. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका. सार्वजनिक ठिकाणी तसेच इतरत्र थुंकू नका. बाहेरून घरात आल्यानंतर प्रथम स्वच्छ हात धुऊन घ्या. 

 

Web Title: sangli news 7 death by swine flu