सांगलीत सात पिस्तुले जप्त दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सांगली - सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री दोघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून सात देशी बनावटीची पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने पिस्तुले आणि जिवंत काडतुसे सापडण्याचा हा अलीकडच्या काळातील पहिलाच प्रकार आहे.

सांगली - सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री दोघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून सात देशी बनावटीची पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे जप्त केली. त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने पिस्तुले आणि जिवंत काडतुसे सापडण्याचा हा अलीकडच्या काळातील पहिलाच प्रकार आहे.

पत्रकार बैठकीत अधीक्षक शिंदे म्हणाले, ‘‘स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील हेडकॉन्स्टेबल अशोक डगळे यांना दोघेजण शंभर फुटी रस्त्यावर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्या परिसरात गुन्हे अन्वेषणचे पथक मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. त्या वेळी हॉटेल जय मल्हारसमोर दोन तरुण संशयितरीत्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे देशी बनावटीची सात पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे, असा तीन लाख ५५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.’’

दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांची नावे सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, रा. सिंधी बुद्रुक, दहिवडी, ता. माण) आणि संतोष शिवाजी कुंभार (२७, रा. नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी आहेत. त्यांच्याकडून अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने आणि त्यांच्या पथकाला रोख १५ हजार रुपयांचे बक्षीस श्री. शिंदे यांनी जाहीर केले. या पथकात उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हेडकॉन्स्टेबल जितेंद्र जाधव, अझर पिरजादे तसेच कनप, जाधव, सोकटे, सावंत यांचा समावेश होता.

अधीक्षक श्री. शिंदे म्हणाले, ‘‘अटक केलेले दोघेजण कुणाला पिस्तूल विकण्यासाठी आले होते? त्यांचे सांगलीत कुणाशी संबंध आहेत? सांगलीतील अवैध हत्यारे बाळगणारे कोण? या सर्व प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन तपास करणार आहे. अटक केलेल्यांमध्ये एकजण स्वत:कडे पिस्तूल ठेवत होता आणि दुसरा पिस्तूल विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधून व्यवहार करत होता.’’

सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता जिल्हाभर लागू आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कुणाकडे अवैध शस्त्रे बाळगल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आता अवैध शस्त्रांचे आव्हान
जिल्ह्यात गॅंगवॉर, खुनापाठोपाठ पोलिसांसमोर आता अवैध शस्त्रांचेही आव्हान उभे राहिले आहे. एकाच वेळी सात पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे सापडल्याने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत गॅंगवॉरमधून दोघांचे खून झाले आहेत. दोन महिलांचे, दोन तरुणांचे आणि एका सुरक्षारक्षकाचाही खून झाला आहे. आता सात देशी बनावटीची पिस्तुले साताऱ्याच्या दोघा तरुणांकडे सापडल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अटक केलेल्या दोघांकडे एकाचवेळी सात पिस्तुले असणे हे अनेक बाजूंनी प्रश्‍न उभे करणारे आहे.

शहरात टोळीयुद्ध पुन्हा डोके वर काढत आहे. दिवसाढवळ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर सांगलीत अवैधरीत्या पिस्तूल विकत घेण्यासाठी कोण उत्सुक आहे? या तरुणांचे येथील गुन्हेगारी विश्‍वाशी काही लिंक आहे का? कुणाच्या संपर्कात हे अवैध हत्यार तस्कर आहेत? या प्रश्‍नांची उत्तरे पोलिसांना तातडीने शोधावी लागतील. पोलिसांना केवळ दोन आरोपी सापडले. उर्वरित संशयितांशी कुणी ‘मांडवली’ करू नये याची दखल घेण्याची गरज आहे. संशयित आरोपी केवळ सातच पिस्तुले विकण्यासाठी आले होते की आणखी ऑर्डर घेण्यासाठी आले होते, याचाही तपास करण्याची गरज आहे.

Web Title: sangli news 7 revolver seized