सांगली जिल्ह्यात 20 बोगस खत उत्पादकांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सांगली - कृषी विभागाने विविध ठिकाणी वर्षभरात 861 खते, बियाणे आणि कीटकनाशकांची तपासणी केल्यानंतर तांत्रिक दोष आढळल्याने 28 प्रकारची खते आणि एका बियाणाचा नमुना अपात्र ठरला आहे. बोगस आणि निकृष्ट अशा वीस खत उत्पादक आणि एका कीटकनाशक उत्पादकावर न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. 

सांगली - कृषी विभागाने विविध ठिकाणी वर्षभरात 861 खते, बियाणे आणि कीटकनाशकांची तपासणी केल्यानंतर तांत्रिक दोष आढळल्याने 28 प्रकारची खते आणि एका बियाणाचा नमुना अपात्र ठरला आहे. बोगस आणि निकृष्ट अशा वीस खत उत्पादक आणि एका कीटकनाशक उत्पादकावर न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. 

जिल्ह्यातील शेतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदल झाला आहे. उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांवर विविध प्रकारच्या खतांचा मारा केला जात आहे. द्राक्ष, ऊस, डाळिंब, केळी, हळद, ढबू मिरचीसह भाजीपाल्यासाठी खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अनेक खत कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. जिल्ह्यात तसेच परजिल्ह्यातून आणि राज्यातून बियाणे आणि खतांचे उत्पादन होते. स्थानिक बियाणे आणि कीटकनाशकांसह परराज्यातूनही आलेल्या खतांची आवक होते. बऱ्याचदा वितरकांकडून पैशाच्या हव्यासापोटी खते, बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे कृषी विभागाकडून अशावेळी छापासत्र सुरू होते. खते, बियाणे आणि कीटकनाशकांची तपासणी करण्यात येते. कृषी विभागाने वर्षभरात खतांचे 385 नमुने, बियाणे 321 आणि 155 कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले. सीलबद्ध खते, बियाणे आणि कीटकनाशकांची पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शंभर नमुन्यांचा तपासणी अहवाल जिल्हा कार्यालयास प्राप्त झाला. वीस खते आणि एक कीटकनाशके बोगस आणि अपात्र असल्याने संबंधित कंपनीविरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खतांचे 28 नमुने तर एक बियाणे वापरण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे ते अपात्र करण्यात आले. 

वर्षानुवर्षे खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे परवाने, नूतनीकरण आणि तपासणीचे कामकाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून केले जात होते. चार महिन्यांपासून परवान्यासह नूतनीकरणाचे काम जिल्हा कृषी विभागाकडे वर्ग झाले आहे. शेतकऱ्यांना बियाणे आणि खते मिळविताना अडचणींना सामोरे जावे लागते. हंगामाला लवकरच सुरवात होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग पुन्हा एकदा कारवाईसाठी सज्ज झाला आहे. बोगस खते आणि बियाणांमुळे प्रतिवर्षी अनेक शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यामुळे अगोदरच कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नुकसानीच्या चक्रात अडकतो. बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशक उत्पादकांविरुद्ध ठोस कारवाई केल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो. 

Web Title: Sangli News action on 20 illegal fertilizer producer