थकबाकी प्रकरणी पेठला बॉम्बे रेयॉन कंपनीवर कारवाई

धर्मवीर पाटील
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

इस्लामपूर - पेठ (ता. वाळवा) येथील 'बॉम्बे रेयॉन' कंपनीवर सुमारे ५१ लाखाच्या कर थकबाकी प्रकरणी पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने कारवाई करण्यात आली.

इस्लामपूर -  पेठ (ता. वाळवा) येथील बहुचर्चित ‘बॉम्बे रेयॉन’ कंपनीवर सुमारे ५१ लाखांच्या कर थकबाकी प्रकरणी  शुक्रवारी पेठ ग्रामपंचायतीतर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा कंपनीने २५ लाख रुपये भरल्याने पंचायत समितीतर्फे कारवाई मागे घेण्यात आली. 

बॉम्बे रेयॉन अर्थात (इस्लामपूर इंटिग्रेटेड टेक्‍स्टाईल पार्क प्रा. लि.) या कंपनीवर थकीत बिल न भरल्याने पेठ ग्रामपंचायतीतर्फे सरपंच मीनाक्षी महाडिक यांच्या आदेशानुसार आज कारवाई करण्यात आली. दुपारी तीनपर्यंत चर्चा सुरू होती. कंपनीकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचे लक्षात येताच दुपारी तीनला तीन युनिट व रात्री उशिरा चौथे युनिट, तसेच सात गेट ‘सील’ करण्यात आले. या कारवाईची आज संपूर्ण वाळवा-शिराळा तालुक्‍यात जोरदार चर्चा सुरू होती.

गावाच्या विकासासाठी कर वसूल होणे आवश्‍यक आहे. नियमानुसार योग्य वेळ देऊन आणि पाठपुरावा करून मगच कारवाई केली. कारवाई कायदेशीर व नियमानुसार आहे. मात्र, रात्री उशिरा त्यांनी २५ लाख रुपये रक्कम खात्यावर वर्ग केल्याने कारवाई मागे घेण्यात आली.
- राहुल गावडे, 

गटविकास अधिकारी 

बॉम्बे रेयॉन ही कंपनी २००७-०८ मध्ये प्रशांत अग्रवाल यांनी पेठ येथे सुरू केली होती. सुमारे ६०० कोटी रुपयांच्या वर हा प्रकल्प आहे. येथे वाळवा व शिराळा तालुक्‍यातील सुमारे दोन हजार कामगार काम करतात. कंपनीकडून ग्रामपंचायतीचे सुमारे ५१ लाख रुपये थकीत होते. वर्षभरापूर्वी दिलेला पाच लाख रुपयांचा धनादेश न वटल्याने न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी आजची कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही दाद न मिळाल्याने गटविकास अधिकारी आणि सरपंच यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आणि कारवाईचे शस्त्र उपसले. विस्तार अधिकारी पी. के. सुतार व अन्य दोघांनी कारवाई केली. कारवाईवेळी उपसरपंच अमीर ढगे, ग्रामसेवक सुरेश पाटील, आनंदराव कदम, तानाजी कदम, शंकर पाटील, चंद्रकांत पवार व ग्रामपंचायतीचे काही सदस्य उपस्थित होते.

 

Web Title: Sangli News action on Bombay Rayon company