घोटाळ्यावर कारवाईसाठी ‘कोल्हापूर पॅटर्न’ हवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

सांगली - शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात घोटवडे (ता. पन्हाळा) एलईडी बल्ब घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवकाच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात आली; तर सरपंचांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले गेले. परंतु, जिल्ह्यात तब्बल १२० ग्रामपंचायतींमध्ये घोटाळा होऊनही अद्याप वसुलीबाबत कारवाई झाली नाही.

सांगली - शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात घोटवडे (ता. पन्हाळा) एलईडी बल्ब घोटाळ्याप्रकरणी ग्रामसेवकाच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात आली; तर सरपंचांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिले गेले. परंतु, जिल्ह्यात तब्बल १२० ग्रामपंचायतींमध्ये घोटाळा होऊनही अद्याप वसुलीबाबत कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमधील सरपंच व ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्‍चित करून कारवाईचा ‘कोल्हापूर पॅटर्न’ मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी वापरण्याची गरज आहे.

कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या ‘एलईडी बल्ब’ खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी जिल्हा परिषदेकडे केली. ‘सकाळ’ने सर्वप्रथम या घोटाळ्यावर प्रकाशझोत टाकला. त्यानंतर विविध ग्रामपंचायतींमध्ये घोटाळा झाल्याची मालिकाच पुढे आली. कुंडलापूरच्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले. त्याच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना रक्कम वसूल का करू नये, याची नोटीस देण्यात आली.

या घोटाळ्याबाबत जिल्हा परिषद स्थायी समिती, अर्थ समिती आणि सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली. जिल्ह्यात १२० ग्रामपंचायतींनी केवळ १४ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या बल्बमध्ये दोन कोटींचा घोटाळा आहे. पाच महिन्यांपूर्वी प्राथमिक अहवालात ही माहिती स्पष्ट झाली. एप्रिलमध्ये अंतिम अहवाल येईल, असे सांगण्यात आले. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून ठोस कारवाई होण्याची आवश्‍यकता आहे.

बल्बची किंमत दोन हजार
कोल्हापूर जिल्ह्यातील ‘मेढा’ने बल्बची किंमत दोन हजार १८ रुपये निश्‍चित केली आहे. सांगली जिल्ह्यात बाजारात मिळणाऱ्या हजार ते बाराशे रुपयांच्या बल्बची किंमत ३५०० पासून ५५०० रुपयांपर्यंत लावली आहे. 

मिरज तालुक्‍यात २४ गावे
एलईडी बल्ब घोटाळ्यावरून मिरज पंचायत समितीच्या मासिक सभा फारच गाजल्या. तालुक्‍यात २४ गावांत घोटाळा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

घोटाळ्याचे चित्र
बल्बची किंमत    ग्रामपंचायती    रक्कम
5500 रुपयांपासून पुढे    30    74 लाख रुपये
4500 ते 5500 रुपये    46    68 लाख रुपये
3500 ते 4500 रुपये    44    54 लाख रुपये
 

Web Title: Sangli News action on fraud case Kolhapur Pattern