इस्लामपुरातील मटका अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

इस्लामपूर - येथील शिवनगर परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून जिल्हा पोलिस प्रमुखांच्या पथकाने १६ जणांना ताब्यात घेत ४६ हजार ५४० रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

इस्लामपूर - येथील शिवनगर परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून जिल्हा पोलिस प्रमुखांच्या पथकाने १६ जणांना ताब्यात घेत ४६ हजार ५४० रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाईने इस्लामपुरात सुरू असलेल्या राजरोस मटक्‍याच्या हिमनगाचे टोक पुन्हा एकदा दिसून आले.

पोलिसांनी गणेश दिलीप पाटोळे (वय २८), कुणाल बाजीराव पाटील (१९), संजय किसन कांबळे (५०), सुजित राजेंद्र शिंदे (२२), प्रशांत प्रकाश देवकुळे (१९), विश्‍वास भीमराव नाईक (४२), रफिक  इकबाल सय्यदखान (३६), हृषीकेश राहुल पाटील (१९), अनिल संपत पाटील (३०), संग्राम बाळासाहेब पवार (२३), विजय रमेश जाधव (२६), उमेश संतोष जाधव (१९), आदित्य अरुण धोतरे (२०), सुदेश भालचंद्र तवर (२९), किरण भालचंद्र देशपांडे (५६), हणमंत केशव गुरव (६४, सर्व रा. इस्लामपूर) आदींना ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद हवालदार मारुती रामचंद्र मोरे यांनी दिली आहे. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

शिवनगर येथील सोपान ऊर्फ काकासाहेब नामदेव नागे याच्या ‘तुझा आशीर्वाद’ असे लिहिलेल्या घरात बेकायदापणे कल्याण-मुंबई मटका-जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाला समजली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी नागेच्या घरावर छापा टाकला. घरात दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी आठ-आठ असे एकूण १६ जण आपल्या समोरील पॅडवरील कागदावर पेनाने काहीतरी लिहित मोबाईलवर बोलत गोलाकार बसलेले दिसून आले. त्यांची चौकशी केली असता सर्वजण शहरातील एजंटाकडून मटका व जुगार आकड्यांचा चिठ्ठया व पैसे गोळा करून या ठिकाणी हिशेब करत  बसत असल्याचे समजले.

छाप्यात पोलिसांनी रोख  रक्कम ४६ हजार ५४०, ५ लाख ४० हजारांच्या ११ मोटारसायकली, एक लाख पाच हजारांचे १९ मोबाईल, ३२० रुपयांचे १६ पॅड, १५४ रुपयांचे १७ पेन,  २४०० रुपयांची १२ कॅलक्‍युलेटर असा एकूण ६ लाख ९४ हजार ४१४ रुपयांचा ऐवज जप्त केला. सोळा  जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घर मालक सोपान  ऊर्फ काकासाहेब नागे फरारी आहे.

Web Title: Sangli News action on Gambling centers in Islampur