पॅचवर्क ठेकेदारांवर अहवालानंतर कारवाई - खेबुडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सांगली - महापालिकेच्या चारही प्रभाग  समितीतील रस्त्यांच्या पॅचवर्क कामाच्या चौकशी  करण्यात येईल. उपायुक्त सुनील पवार यांच्याकडून अहवाल मिळताच दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज सांगितले. शुक्रवारी गणेशोत्सव तयारीसाठी प्रशासनाची बैठक होत आहे. 

सांगली - महापालिकेच्या चारही प्रभाग  समितीतील रस्त्यांच्या पॅचवर्क कामाच्या चौकशी  करण्यात येईल. उपायुक्त सुनील पवार यांच्याकडून अहवाल मिळताच दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज सांगितले. शुक्रवारी गणेशोत्सव तयारीसाठी प्रशासनाची बैठक होत आहे. 

पॅचवर्क कामांसाठी ६० लाखांचा निधी मंजूर होता. केवळ पंधरा लाखांचा निधी शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी स्थायी समितीत दिली. त्यावर एकच गदारोळ उठला. शहरभर खड्डे कायम असताना पालिकेने ३५ लाखांचे पॅचवर्क नेमके कोठे केले, असा सवाल करण्यात आला. या कामाच्या चौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्तीचे आदेश सभापती संगीता हारगे यांनी काल दिले होते. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सव तोंडावर आहे. शहरातील रस्ते  खड्ड्यात गेलेत. एकही रस्ता सुस्थितीत नाही. चार प्रभाग समित्यांसाठी प्रत्येकी पंधरा लाखांचा निधी पॅचवर्कसाठी दिला होता. त्यात प्रभाग समिती दोन व तीनमधील निधी संपला असून, प्रभाग एकमध्ये अडीच लाख व प्रभाग चारमध्ये साडेबारा लाखांचा निधी शिल्लक आहे. आज आयुक्तांनी खुलासा केला. ते म्हणाले,‘‘सर्व प्रकरणांची चौकशी दोन दिवसांत पूर्ण होईल. गणेशोत्सवापूर्वी किमान मुख्य रस्ते खड्डेमुक्त असतील.’’

‘आरपीं’ना ‘सेवा’ संधी नाहीच
नगर अभियंता आर. पी. जाधव यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत घ्यावे यासाठी चोरीछुपे ठराव हेच स्थायी समितीचे सदस्य करतात. निवृत्तीनंतर दररोज पाचशे रुपयांच्या रोजंदारीवर नेमणूक करण्यात विशेष रस दाखवणारे जाधव आणि त्यांच्यासाठी गुपचूप ठराव करणारे स्थायीचे सर्व सदस्य. तीच स्थायी समिती शहरातील रस्त्यांचे पुरते वाटोळे झाले म्हणून ओरड  करते यातील विरोधाभास अनाकलनीय आहे. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी मात्र जाधव यांना यापुढे महापालिकेत सेवेची संधी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले. लवकरच शासनाकडून पात्र अधिकारी महापालिकेत रुजू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नगर अभियंतापदाची जबाबदारी सतीश सावंत यांना दिली जाणार आहे.

Web Title: sangli news Action on patchwork contractors